गुवाहाटी - तब्बल पाच वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघानं टी-20मध्ये भारतावर विजय मिळवला आहे. 28 सप्टेंबर 2012 नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतानं एकही टी-20 सामना गमावलेला नव्हता. आज झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आठ विकेटनं भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं सलग आठ सामन्यात पराभवाची मालिकाही खंडीत केली. रांचीत झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवनंतर ऑस्ट्रेलियानं दमदार पुनरागमन केलं. तसेच तीन सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. जासन बेहरेंडोर्फनं धारधार गोलंदाजी करताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा निर्णय सार्थ ठरवला. बेहरेंडोर्फनं रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, शिखर धवन आणि मनिष पांडे यांना बाद करत भारताचे कंबरडेच मोडलं. बेहरेंडोर्फनं चार षटकांत 16 धावांच्या मोबदल्यात भारताचे चार गडी बाद केले. भारताकडून केदार जाधव 27 आणि हार्दिक पांड्या 25 यांच्या व्यतीरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. धोनी 13, मनिष पांडे 6, कोहली 0, रोहित 8 आणि शिखर धवननं दोन धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून बेहरेंडोर्फशिवाय झम्पानं दोन तर नाथन कुल्टर नाईल, टाय आणि स्टोईन्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वगडी बाद 118 धावा करून ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 119 धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 2 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान 16 षटकांत सहज पूर्ण केले. हेन्रिकेज (नाबाद 62) आणि हेड (नाबाद 34) हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 109 धावांची नाबाद भागिदारी केली.