पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रज्जाक त्याच्या एका लाजिरवाण्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खरं तर रज्जाकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रश्न उपस्थित करताना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल एक वादग्रस्त विधान केले, ज्यावरून नेटकऱ्यांसह पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी देखील संताप व्यक्त केला. रज्जाकने जेव्हा हे विधान केले तेव्हा तिथे शाहिद आफ्रिदी देखील उपस्थित होता. मात्र, आफ्रिदीने या कार्यक्रमानंतर बोलताना याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आणि रज्जाकने माफी मागायला हवी असे म्हटले. अशातच शोएब अख्तरने रज्जाकच्या वक्तव्याचा निषेध करताना उपस्थितीतांना देखील सुनावले आहे.
रज्जाकचे लाजिरवाणे विधान अब्दुल रज्जाकने म्हटले होते, "चांगली कामगिरी करण्यासाठी संघाचा हेतू योग्य असला पाहिजे. जर मी ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न केले आणि चांगली मुले व्हावीत असा विचार केला तर तसे होणार नाही. तुम्हाला तुमचा हेतू आधी बरोबर सेट करावा लागेल." रज्जाक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत होता.
आफ्रिदीचे स्पष्टीकरणअब्दुल रज्जाकने ऐश्वर्या रायबद्दल विधान केल्यानंतर तिथे उपस्थित असलेला आफ्रिदी हसला होता. याचा दाखला देत चाहत्यांसह नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला लक्ष्य केले. यावर बोलताना आफ्रिदीने सांगितले की, जेव्हा रज्जाक बोलत होता तेव्हा मला काहीच कळले नव्हते. मी केवळ कोणत्याही कारणाशिवाय हसत होतो, कारण रज्जाक नेहमी काही ना काही विनोद करत असतो. पण, जेव्हा मी ती क्लिप ऐकली तेव्हा लगेच रज्जाकला मेसेज करून याप्रकरणी माफी मागायला सांगायला हवी असा विचार केला. ही खरोखरच चुकीची गोष्ट असल्याचेही आफ्रिदीने सांगितले.
शोएब अख्तरचा संताप अब्दुल रज्जाकच्या विधानावरून सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेटला ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने सोशल मीडियाच्या माध्यमातून याप्रकरणी व्यक्त होताना म्हटले, "अब्दुल रज्जाकने केलेल्या विधानाचा मी तीव्र निषेध करतो. कोणत्याही महिलेचा असा अनादर होता कामा नये. त्याच्या शेजारी बसलेल्या लोकांनी हसून टाळ्या वाजवण्यापेक्षा लगेच आवाज उठवायला हवा होता."