Virat Kohli for Sri lanka Series: टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता टीम इंडिया आता श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत दोन वेगवेगळे कर्णधार मिळाले आहेत. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ सामन्यांची एकदिवसीय आणि ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेत तर सूर्यकुमार यादव टी-२० मालिकेत कर्णधारपद असणार आहे. याशिवाय विराट कोहली वनडे मालिकेत पुनरागमन करत आहे. या घोषणेनंतर विराट कोहलीने एक महत्त्वाचे विधान केले आहे.
नुकतीच राहुल द्रविड यांच्या जागी गौतम गंभीरची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयने निवड केली होती. गौतम गंभीरने त्याच्या अटी शर्थींवर प्रशिक्षक पद स्विकारलं आहे. अशातच श्रीलंका दौऱ्यातूनच गंभीरने आपली धारदार वृत्ती दाखवून देत आपला हट्ट पूर्ण केला. खरंतर वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी ब्रेक घेतला होता. त्यांनी श्रीलंका दौऱ्यातून विश्रांतीही मागितली होती. पण सर्व खेळाडूंनी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळावे अशी गंभीरची इच्छा होती आणि त्याने ती पूर्ण करुनच घेतली.
त्यामुळे आता श्रीलंका दौऱ्यावर विराट कोहली खेळणार हे निश्चित झालं आहे. मात्र या निर्णयामुळे दोघांमध्ये खटके उडणार का अशी चर्चा सुरु झाली होती. कारण गेल्या काही वर्षात विराट आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सर्वांनीच पाहिले होते. आयपीएलदरम्यान एका सामन्यात दोघांमध्ये बाचाबाचीही झाली होती. मात्र आता या सगळ्या चर्चांवर विराट कोहलीने महत्त्वाचे विधान केलं आहे.
विराट कोहली आणि गंभीर यांच्यात मैदानावर अनेकदा मतभेद झाले आहेत. त्यामुळे गौतम गंभीर हेड कोच झाल्यामुळे त्यांच्यातील वाद आणखी चिघळणार असं म्हटलं जात होतं. मात्र क्रिकबझच्या वृत्तानुसार, या वादाचा खेळावर परिणाम होणार नसल्याचे विराट कोहलीने म्हटलं आहे. गंभीरबरोबर भूतकाळात झालेल्या वादांचा परिणाम भारतीय संघामध्ये त्यांच्या असलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्यावर होणार नाही असं विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितलं आहे. टी-२० वर्ल्डक फायनलनंतर या मुद्द्यावर चर्चा झाली असावी, असेही वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे दोन्ही मालिका जिंकून गंभीरला आपल्या कार्यकाळाची सुरुवात करायची आहे. गौतम आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची तयारी श्रीलंकेसोबतच्या एकदिवसीय मालिकेपासून सुरू करणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना एकाही एकदिवसीय सामन्यातून बाहेर ठेवता कामा नये, अशी त्याची इच्छा होती.