shikhar dhawan ipl । मोहाली : आयपीएलच्या १६व्या (IPL 2023) हंगामातील अठरावा सामना पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स (GT vs PBKS) यांच्यात झाला. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरातने ६ गडी आणि १ चेंडू राखून विजय मिळवला. पंजाबने सुरूवातीपासूनच धिमी फलंदाजी केली त्यामुळे संघाला निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १५३ धावा करता आल्या. अशातच पंजाबचा कर्णधार शिखर धवनने सामना झाल्यानंतर फलंदाजांच्या धिम्या खेळीचा दाखला देत त्यांना सुनावले. एवढे डॉल बॉल खेळल्यानंतर सामना कसा जिंकणार असा प्रश्न धवनने उपस्थित केला.
मोहालीत झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ८ गडी गमावून १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सच्या संघाने १९.५ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. खरं तर कमी धावसंख्या असतानाही पंजाबच्या गोलंदाजांनी कमाल करून सामन्यात रंगत आणली. पण राहुल तेवतिया पुन्हा एकदा महत्त्वाच्या क्षणी गोलंदाजासाठी काळ ठरला. तेवतियाने २ चेंडूत केलेल्या ५ धावांनी गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.
आम्हाला आमच्या फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज - धवन
पंजाब किंग्जला आपल्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. घरच्याच मैदानावर झालेल्या पराभवानंतर कर्णधार शिखर धवनने फलंदाजांवर टीकास्त्र सोडले. सामन्यानंतर फलंदाजांच्या धिम्या खेळीबद्दल बोलताना धवनने म्हटले, "आम्ही जास्त धावा केल्या नाहीत या गोष्टीशी मी सहमत आहे. जर तुम्ही डॉट बॉल पाहिले तर आम्ही एकूण ५६ डॉट बॉल खेळले, त्यामुळेच सामना हरलो. त्यामुळे आम्हाला या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. जेव्हाही आघाडीचे खेळाडू लवकर बाद होतात तेव्हा संघावर दबाव येतो. पण आम्हाला यातून मार्ग काढायला हवा. आमच्या फलंदाजांना अधिक धावा कराव्या लागतील मगच गोलंदाजांना लढण्याची संधी मिळेल."
दरम्यान, पंजाब किंग्जच्या संघाला ४ सामन्यांतील २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकून शानदार सुरूवात केली होती. पण यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वातील संघाला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. खराब फलंदाजी हे पंजाबच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: After gujarat titans won the pbks vs gt match in IPL 2023, Punjab Kings captain Shikhar Dhawan expressed his displeasure with the team's batsmen
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.