कोलकाता - भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिस-या दिवसअखेर श्रीलंकेचा डाव सुस्थितीत आहे. श्रीलंकेच्या चार बाद 165 धावा झाल्या आहेत. श्रीलंकेचा संघ सात धावांनी पिछाडीवर आहे. भारताने पहिल्या डावात 172 धावा केल्या होत्या. कोलकात्यातील खेळपट्टीने लंकेच्या वेगवान गोलंदाजांना साथ दिल्याने भारतही श्रीलंकेची दाणादाण उडवेल ही अपेक्षा फोल ठरली.
समराविक्रमा (23) आणि करुणा रत्ने (8) दोन्ही सलामीवीर 34 धावात तंबूत परतल्यानंतर थिरीमाने (51) आणि मॅथ्यूजने (52) डाव सावरला. दोघांनी तिस-या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. कर्णधार चंडीमल (13) आणि डिकवेला (14) धावांवर नाबाद आहेत. भारताकडून भुवनेश्वर कुमारने दोन आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
श्रीलंकेच्या भेदक मा-यापुढे पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 172 धावांवर आटोपला. चेतेश्वर पूजाराच्या (52) अर्धशतकाचा अपवाद वगळता अन्य आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. वृद्धीमान सहा (24), रविंद्र जाडेजा (22) आणि मोहम्मद शामी (24) यांनी थोडाबहुत प्रतिकार केल्याने भारताला 172 पर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून लकमलने सर्वाधिक चार, गामाजे, शानाका आणि परेराने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-श्रीलंका पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याचे दोन दिवस वाया गेल्यानंतर आज शनिवारी तिस-या दिवशीही भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला. कालच्या पाच बाद 74 वरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर भारताला तीन धक्के बसले. काल 47 धावांवर नाबाद असलेला चेतेश्वर पूजारा अर्धशतक झळकवल्यानंतर बाद झाला.
गामाजेने (52) धावांवर त्याला बोल्ड केले. विकेटकीपर वृद्धीमान सहाला (29) धावांवर पेरराने मॅथ्यूजकरवी झेलबाद केले. रविंद्र जाडेजाला (22) धावांवर परेराने पायचीत पकडले. भारतातर्फे सहा आणि जाडेजाने सातव्या विकेटसाठी सर्वाधिक 48 धावांची भागीदारी केली.
खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असल्याने भारतीय फलंदाजांचा संघर्ष सुरु आहे. भारताकडून फक्त चेतेश्वर पुजाराने संयम, एकाग्रता आणि कौशल्याचा परिचय देत लंकेच्या गोलंदाजांविरुद्ध संघर्ष केला. पहिल्या दिवशी ११.५ तर दुस-या दिवशी २१ षटकांचाच खेळ झाला. पहिल्या दिवशी सुरंगा लकमलने भेदक मारा केल्यानंतर शुक्रवारी वेगवान गोलंदाज दासून शनाकाने सकाळच्या सत्रात २३ धावांत दोन गडी बाद केले. अजिंक्य रहाणे(४)आणि रविचंद्रन अश्विन(४)हे त्याचे बळी ठरले.
‘द. आफ्रिका दौ-याच्या तयारीसाठी ईडनची खेळपट्टी चांगली’ईडनवर लंकेविरुद्ध हिरव्यागार खेळपट्टीवर पहिल्या कसोटीत भारतीय संघाची पडझड झाली असली तरी द. आफ्रिका दौºयाच्या तयारीसाठी ही खेळपट्टी अगदी चांगली असल्याचे मत नुकताच निवृत्ती जाहीर करणारा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने व्यक्त केले.भारतीय संघ पुढील वर्षी ५ जानेवारीपासून द. आफ्रिकेत दोन महिन्यांचा दौरा करीत असून तीन कसोटी, सहा वन डे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.