IND vs SA 1stT20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आधीच हार्दिक पांड्या मालिकेतून माघार घेऊन बाहेर गेला आहे. तशातच आता आणखी ऑलराऊंडर खेळाडूला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे आता तीन मोठे स्टार खेळाडू या मालिकेचा भाग होऊ शकणार नाहीत. BCCI ने हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आहे. दुसरीकडे मोहम्मद शमी करोनाग्रस्त आहे. तर त्यातच नवा धक्का म्हणजे दीपक हुडा (Deepak Hooda) दुखापतीमुळे मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना आज होणार आहे. अशा परिस्थितीत ३ खेळाडूंना संघात ऐनवेळी स्थान देण्यात आले आहे.
'या' ३ खेळाडूंचा टीम इंडियात करण्यात आलाय समावेश
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका घरच्या मैदानावर खेळायची आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वन डे मालिकाही खेळवली जाणार आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना आज (२८ सप्टेंबर) होणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी वाईट बातमी म्हणजे स्टार खेळाडू दीपक हुडा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या तिघांच्या जागी उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद यांचा संघात समावेश केला आहे. BCCIनेच ट्विट करून ही माहिती दिली आहे.
दीपक हुडाला काय झालं?
दीपक हुडाच्या पाठीला दुखापत झाली आहे. आता त्याला रिहॅबसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (NCA) अहवाल द्यावा लागणार आहे. BCCIने रविवारीच एक निवेदन जारी केले होते की, 'दीपक हुडा पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता.' आता BCCIने ट्विट करून दीपक हुडाला NCAमध्ये रिहॅब करावे लागेल असे सांगितले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका-
- पहिला T20 - २८ सप्टेंबर (तिरुवनंतपुरम)
- दुसरी T20 - २ ऑक्टोबर (गुवाहाटी)
- तिसरी T20 - ४ ऑक्टोबर (इंदूर)
- पहिली वनडे - ६ ऑक्टोबर (लखनौ)
- दुसरी वनडे - ९ ऑक्टोबर (रांची)
- तिसरी वनडे - ११ ऑक्टोबर (दिल्ली)