T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ ची स्पर्धा म्हणजे पाकिस्तानी संघासाठी एक वाईट स्वप्न. शेजाऱ्यांना त्यांच्या सलामीच्या सामन्यात अमेरिका आणि त्यानंतर भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला. मग कॅनडाविरूद्ध विजय मिळवून पाकिस्तानने सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. पण, आयर्लंड आणि अमेरिका यांच्यातील सामन्यात पाऊस झाला अन् पाकिस्तान वाहून गेला. ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझम आणि त्याच्या संघावर सर्व बाजूंनी टीका होत आहे.
प्रथम यजमान अमेरिकेविरुद्ध आणि नंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानी जनता खूपच निराश झाली. पण, आता हे प्रकरण पाकिस्तानच्या संसदेत पोहोचले आहे, तिथे अब्दुल कादिर पटेल नावाच्या खासदाराने बाबर आझम आणि पाकिस्तान संघावर टीकास्त्र सोडले. संसदेत बोलताना खासदाराने पाकिस्तानी संघावर टीकेचे बाण सोडले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा उल्लेख करत त्यांनी आपल्या संघाला घरचा आहेर दिला.
खासदार अब्दुल कादिर पटेल म्हणाले की, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला काय झाले आहे. ते अमेरिकेकडून देखील पराभूत झाले. पाकिस्तानचा भारतीय संघानेही पराभव केला. बाबर आझमने आपल्याच एका वरिष्ठ खेळाडूकडून धडा घेतला पाहिजे, कागदपत्रे दाखवत माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचे सांगायला हवे. असे केल्याने बाबर आझम संपूर्ण प्रकरण शांत करू शकतो. खरे तर अविश्वास प्रस्तावादरम्यान इम्रान खान यांनी पॅम्प्लेट दाखवताना तेच शब्द बोलले होते, ज्याचा उल्लेख अब्दुल कादिर पटेल यांनी केला आहे.
दरम्यान, मागील ट्वेंटी-२० विश्वचषकातील उपविजेता पाकिस्तानचा संघ यावेळी काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यांना आपल्या सुरुवातीच्या दोन्हीही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. कॅनडाविरूद्धचा सामना कसाबसा जिंकून बाबर आझमच्या संघाने विजयाचे खाते उघडले.