नवी दिल्ली : इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने मंगळवारी आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळला. मात्र इंग्लिश संघ आपल्या स्टार खेळाडूच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरला. लक्षणीय बाब म्हणजे स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकताच इंग्लंडॲण्ड वेल्स क्रिकेट बोर्डावर (ECB) माजी क्रिकेटपटूंनी निशाणा साधला आहे. स्टोक्सच्या या तडकाफडकी निर्णयानंतर केव्हिन पीटरसनने (Kevin Pietersen) एक सूचक ट्विट करून ईसीबीचा भोंगळ कारभार उघड केला आहे.
नेमकं काय म्हटलय पीटरसनने?
"मी यापूर्वी देखील सांगितले आहे की, सामन्यांचे वेळापत्रक फारच विचित्र होते त्यामुळे आम्ही त्याचा सामना करू शकलो नाही. म्हणूनच मी देखील एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण मी एकदिवसीय क्रिकेट मधून संन्यास घेतल्यामुळे ईसीबीने माझी टी-२० क्रिकेटमधून देखील हकालपट्टी केली आणि माझ्यावर बंदी घातली." एकूणच पीटरसनने ईसीबीच्या कारभारावर गंभीर आरोप करत स्टोक्सला एक सूचक इशारा दिला आहे.
बेन स्टोक्सने संन्यास घेताना एक वक्तव्य केल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. "ज्या पद्धतीने तिन्ही फॉर्मेटचे वेळापत्रक आहे ते पाहता मी संघाला १०० टक्के देऊ शकत नव्हतो आणि यामुळेच मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे." असं स्टोक्सने म्हटले होते तो सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे.
केव्हिन पीटरसनने मे २०१२ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. सलग तिन्ही फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळणे जगभरातील दिग्गज खेळाडूंना त्रासदायक ठरते. लक्षणीय बाब म्हणजे आम्ही खेळाडू म्हणजे कोणती कार नाही ज्यामध्ये पेट्रोल टाकलं की ती चालेल अशा शब्दांत स्टोक्सने संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आता स्टोक्सच्या या निर्णयानंतर ईसीबी त्याला आगामी काळात टी-२० क्रिकेट खेळण्याची परवानगी देते की नाही हे पाहण्याजोगे असेल.