Shoaib Akhtar On India's Performance Against Sri Lanka : भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करून आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सलग तिसऱ्या विजयासह टीम इंडियाने आपला विजयरथ कायम ठेवला आहे. भारताचा स्पर्धेतील सलामीचा सामना पावसामुळे रद्द झाला. पाकिस्तानविरूद्धचा सामना रद्द झाल्यानंतर रोहितसेनेने नेपाळचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. त्यानंतर सुपर ४ मध्ये पाकिस्तान आणि नेपाळचा पराभव करून अंतिम फेरीचे तिकिट मिळवले. श्रीलंकेविरूद्धच्या भारताच्या विजयामुळे शेजारी पाकिस्तानला फायदा झाला आहे. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने खुलासा केला असून त्याला असे फोन येत होते की, भारताला मुद्दाम हा सामना हरायचा होता.
भारत-श्रीलंका सामन्यानंतर शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर विश्लेषण करताना सांगितले की, त्याला काही लोकांकडून फोन आले की, टीम इंडियाला मुद्दाम हा सामना गमवायचा आहे. यावर अख्तरने फोन करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. "हा सामना जिंकून आपण अंतिम फेरीत पोहोचणार हे माहीत असताना भारत का पराभूत होईल का?", असा प्रश्न अख्तरने उपस्थित केला. भारताच्या विजयानंतर अख्तरने भारतीय शिलेदारांचे तोंडभरून कौतुक केले. श्रीलंकेचा २० वर्षीय युवा फिरकीपटू दुनिथा वेल्लालागेचे कौतुक करताना अख्तरने म्हटले, "त्याने खूप चांगली गोलंदाजी केली आणि भारतीय फलंदाजांची कोंडी केली. कुलदीप यादवने देखील कमाल करत चार बळी घेतले. पण, वेल्लालागेने पाच बळी घेऊन भारताच्या स्टार फलंदाजांना तंबूत पाठवले."
अख्तरचा पाकिस्तानी संघाला सल्ला
यजमान पाकिस्तानला भारताकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागल्याने बाबर आझमच्या संघाला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे. अशातच भारत आणि श्रीलंका या सामन्यातून पाकिस्तानी खेळाडूंनी शिकायला हवे, असे अख्तरने नमूद केले. या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी संघर्ष केला आणि पाकिस्तानला देखील अशी लढाई करण्याची गरज आहे, असेही अख्तरने सांगितले.
भारताची अंतिम फेरीत धडक
आशिया चषक २०२३ मध्ये विजयाची हॅटट्रिक लगावून भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. काल झालेल्या सामन्यात 'आशियाई किंग्ज' श्रीलंकेला ४१ धावांनी पराभूत करून टीम इंडियाने सलग तिसरा विजय साकारला. या विजयामुळे शेजारी पाकिस्तानला सुखद धक्का मिळाला. कारण पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आता अंतिम फेरीसाठी लढत होईल. यातील विजयी संघ भारतासोबत रविवारी अंतिम सामना खेळेल.
Web Title: After ind vs sl match in asia cup 2023 shoaib akhtar said pakistan team should learn from this
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.