Join us  

दुखावलेल्या चिमुरडीचे 'हार्दिक' अभिनंदन; सामन्यानंतर पांड्याने दिली खास 'भेट', पाहा video

वेस्ट इंडिजविरूद्धच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर भारतीय संघाने तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे.

By ओमकार संकपाळ | Published: August 09, 2023 8:07 PM

Open in App

IND vs WI, Hardik Pandya : वेस्ट इंडिजविरूद्धच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर भारतीय संघाने तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने ८३ धावांची झंझावाती खेळी केली, ज्यामुळे टीम इंडियाने १६० धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग केला. युवा तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद परतला. तिलक ४९ धावांवर असताना भारताला विजयासाठी २ धावांची आवश्यकता होती. अशातच कर्णधाक हार्दिक पांड्याने षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केला. तिलकचे अर्धशतक पूर्ण होऊ न दिल्याने चाहत्यांनी हार्दिकला लक्ष्य केले पण सामन्यानंतर पांड्याच्या एका कृतीने सर्वांचे मन जिंकले.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने सरावादरम्यान एक मोठा फटका मारला. पांड्याने मारलेला हा चेंडू सरळ जाऊन स्टँडवर बसलेल्या चिमुरडीला लागला. या घटनेनंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने देखील मुलीला पाहण्यासाठी हार्दिकडे विनंती केली. त्यानंतर हार्दिकने त्या मुलीला मॅचनंतर गिफ्ट देण्याचे प्रॉमिस केले. 

हार्दिकने दिले स्पेशल गिफ्टतिसरा सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याने आवर्जुन त्या चिमुकलीची भेट घेतली. पांड्याने सामना जिंकल्यानंतर पॅडही न काढता संबंधित चिमुकलीच्या दिशेने धाव घेतली. हार्दिकने एका चेंडूवर सही करून स्टँडमध्ये बसलेल्या मुलीला भेट म्हणून दिला. ज्या मुलीला चेंडू लागला होता त्या मुलीला हार्दिकडून ही भेट मिळताच तिने जल्लोष केला. हार्दिकच्या हृदय जिंकणाऱ्या कामाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारताने वेस्ट इंडिजचा विजयरथ रोखलापहिले दोन सामने जिंकल्यानंतर यजमान वेस्ट इंडिजने तिसऱ्या ट्वेंटी-२० मध्येही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे पसंत केले. भारताकडून कुलदीप यादवने तीन बळी घेतले तर वेस्ट इंडिजने १५९ धावा करून सन्मानजनक आव्हान उभे केले. याला प्रत्युत्तर देताना भारताने एकवेळ ३४ धावांत दोन बळी गमावले होते. पण, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करत सामना एकतर्फी केला. सूर्यकुमारने ४४ चेंडूंत १० चौकार आणि चार षटकारांसह ८३ धावा केल्या. तर तिलक वर्माने ३७ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ४९ धावा करून नाबाद राहिला. भारताने १७.५ षटकात ३ गडी गमावत १६४ धावा केल्या आणि ७ गडी राखून विजय साकारला.

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजहार्दिक पांड्यासोशल व्हायरलभारतीय क्रिकेट संघ
Open in App