Join us  

IND vs PAK : "यंदाचा वर्ल्ड कप भारताचाच", टीम इंडियाचा 'खेळ' पाहून पाकिस्तानी खेळाडूचं विधान

भारतीय संघाने आपला विजयरथ कायम ठेवताना पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 1:57 PM

Open in App

IND vs PAK, ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघाने आपला विजयरथ कायम ठेवताना पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. वन डे विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाने विजयी हॅटट्रिक लगावून पाकिस्तानविरूद्ध ८-० असे वर्चस्व कायम राखले. वन डे विश्वचषकात एकदाही पाकिस्तानी संघाला भारताविरूद्ध विजय मिळवता आला नाही. एकतर्फी झालेल्या सामन्यात यजमान भारताने मोठा विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने ८६ धावांची अप्रतिम खेळी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पाकिस्तानच्या पराभवानंतर शेजारील संघाचे माजी खेळाडू आपल्या खेळाडूंवर निशाणा साधत आहेत. हार जीत होत असते पण लढाईच न झाल्याने पाकिस्तानी चाहत्यांनीही आक्रोश व्यक्त केला. 

"यंदाचा वर्ल्ड कप भारताचाच"पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू तन्वीर अहमदने बाबर आझमच्या संघावर सडकून टीका केली. सलामीवीर इमाम-उल-हकवर अहमदने खालच्या पातळीवर टीका केली. याशिवाय शादाब खान, इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद नवाज यांनाही त्याने लक्ष्य केले. तन्वीर अहमदने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, "पाकिस्तानी संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. भारताविरूद्धचा सामना एकतर्फी झाल्याने मजा गेली. पाकिस्तानी खेळाडू संघासाठी नव्हे तर स्वत:साठी खेळतात हे स्पष्टच झाले. टीम इंडियाची कामगिरी शानदार होती त्यामुळे मला वाटते की, यंदाचा विश्वचषक भारताचाच आहे यात शंका नाही." 

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. वन डे विश्वचषकात एकदाही पाकिस्तानला भारताविरूद्ध विजय मिळवता आला नाही. रोहितसेनेने देखील आपला विजयरथ कायम ठेवत शेजाऱ्यांची पळता भुई थोडी केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने चांगली सुरूवात केली. इमाम-उल-हक आणि अब्दुला शफीक या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी पहिल्या बळीसाठी भारताला तरसवले. पण, मोहम्मद सिराजने आपल्या चौथ्या षटकांत शफीकला बाहेरचा रस्ता दाखवून पाकिस्तानला पहिला धक्का दिला. 

हार्दिक पांड्याने इमामला बाद करून भारताचे सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या बळीसाठी मोठी भागीदारी नोंदवली. पण, सिराजने बाबरचा त्रिफळा काढून पाकिस्तानला तिसरा झटका दिला. त्यानंतर शेजाऱ्यांची गाडी रूळावरून घसरली. जसप्रीत बुमराहने मोहम्मद रिझवान आणि शादाब यांना चीतपट केले. अखेर पाकिस्तानी संघ ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. 

भारताचा मोठा विजयपाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबाबर आजम