मुंबई - टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाने विजयी जल्लोष साजरा केला. देशात एकीकडे होळीचा माहोल असताना दुसरीकडे भारतीय संघाच्या विजयामुळे होळी अधिकच रंगतदार झाली. कर्णधार विराट कोहलीपासून ते टीममंधील सर्वच सदस्यांनी चॅम्पियन ट्रॉफी हातात घेऊन आनंद व्यक्त केला. या विजयानंतर क्रुणाल पांड्यानं आपल्या बालपणीचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, क्रुणाल आणि हार्दीक पांड्या यांना बक्षीस मिळाल्याचं दिसत आहे.
भारतीय संघातील धुव्वादार जोडी असलेल्या क्रुणाल पांड्या अन् हार्दीक पांड्यानं विजयानंतर चॅम्पीयन ट्रॉफीसह फोटोशूट केले. सोशल मीडियावरही या बंधुंचा हा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र, या फोटोसह क्रुणाल पांड्यानं आता बालपणीचा फोटो शेअर केला आहे. इथून सुरू झालेला आमचा प्रवास, आता इथपर्यंत पोहोचलाय.. असे कॅप्शन क्रुणालने दिले आहे. या दोन फोटोत मोठ्या काळाचं अंतर आहे. बालपणीही क्रिकेटमध्ये क्रुणाल आणि हार्दीक यांनी पारितोषिक मिळवलं आहेच, आताही त्यांची उत्कृष्ट खेळी भारतीयांची मने जिंकते. हार्दीक पांड्याचे हीट शॉट, क्रुणालची फिरकी क्रिकेट चाहत्यांच्या आवडीची बनलीय. म्हणून, या पांड्या बंधुंच्या जोडीला भारतीयांचा लाईक मिळतोच.
भारताचा 7 धावांनी विजय
सलामीवीर शिखर धवन, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत व अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीनंतर भुवनेश्वर कुमार (३-४२) व शार्दूल ठाकूरच्या (४-६७) यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने रविवारी येथील गहुंजे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या व निर्णायक लढतीत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत २-१ अशी सरशी साधली. यापूर्वी कसोटी व टी-२० मालिका जिंकणाऱ्या यजमान भारतीय संघाने वन-डे मालिकेतही विश्वविजेत्या संघाचा पराभव करीत वर्चस्व गाजवले. सामन्यातील अखेरचे निर्णायक षटक टाकणाऱ्या नटराजनने १० षटकांत ७३ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. (India VS England: India beat England & win the ODI series)
विराटला आश्चर्य
सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, जेव्हा दोन आघाडीचे संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा ते सामना अटीतटीचे होतात. सॅम करणने खूप चांगली खेळी केली. मात्र आमच्या गोलंदाजांनी सातत्याने बळी टिपले. तसेच शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि नटराजन यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही काही झेल सोडले, ही बाब निराशाजनक होती. मात्र असे असले तरी अखेरीस आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. मात्र शार्दुल ठाकूरला सामनावीर आणि भुवनेश्वर कुमारला मालिकावीर पुरस्कार मिळाला नाही, याचे मला आश्चर्य वाटले. सर्वात जास्त श्रेय हे गोलंदाजांनाच आहे कारण त्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.