चेन्नई, दि. 17 - पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या चेन्नई येथील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा फडशा पाडला. टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अक्षरशः हतबल झाले होते. डकवर्थ लुइस नियमानुसार मिळालेल्या 21 षटकात 164 धावांच्या आव्हानाचं लक्ष्य घेऊन उतरलेला कांगारूंचा संघ 9 गडी बाद केवळ 137 धावा करू शकला आणि भारताने 26 धावांनी विजय मिळवला. यासोबत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून युजवेंद्र चहलने तीन तर हार्दिक पांड्या , कुलदिप यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले. बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला एक गडी बाद करण्यात यश आलं. गेल्न मॅक्सवेल वगळता एकाही कांगारूंच्या फलंदाजाला मैदानावर तग धरता आला नाही. त्याने 39 धावा केल्या. सामन्याच्या शेवटी जेम्स फॉकनरने नाबाद 32 धावा करून थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
त्यापूर्वी निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 282 धावांचं आव्हान दिलं. पण पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात डकवर्थ लुइस नियमानुसार कांगारूंना 21 ओव्हरमध्ये 164 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. 164 धावांचं आव्हान घेऊन उतरलेल्या कांगारू संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर कार्टराइटच्या बुमराहने अवघ्या एका धावेवर दांड्या उडवल्या. त्यानंतर आलेल्या कर्णधार स्मिथलाही केवळ एका धावेवर बाद करत हार्दिक पांड्याने जबर धक्का दिला. त्यानंतर सातव्या षटकात त्याने हेडची विकेट घेत कांगारूंची अवस्था बिकट केली. त्यालाही अवघ्या एका धावेवर पांड्याने धोनीकरवी बाद केले. डेव्हिड वॉर्नरचा जम बसत आहे असं वाटत असतानाच भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने त्याला 25 धावावंर यष्टीरक्षक धोनीकडे झेल देण्यास भाग पाडलं. गेल्न मॅक्सवेल वगळता एकाही कांगारूंच्या फलंदाजाला मैदानावर तग धरता आला नाही. 39 धावांवर त्याला युजवेंद्र चहलने बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाच्या आशा संपवल्या. सामन्याच्या अखेरीस अष्टपैलू जेम्स फॉकनरने नाबाद 32 धावा केल्या.
अष्टपैलू हार्दिक पांड्याने केलेली तुफान फटकेबाजी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनीने केलेल्या घणाघाती प्रहारामुळे भारताला 250 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आलं. हार्दिक पांड्याने फिरकीपटू अॅडम झम्पाच्या एका षटकात लागोपाठ तीन षटकार लगावत सामन्याची सुत्रं भारताकडे फिरवली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा पांड्या शतक पूर्ण करणार असे वाटत होते. पण 66 चेंडूत 83 धावा फटकावून तो बाद झाला. सामन्याच्या अखेरच्या षटकात जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर उत्तूंग षटकार लगावण्याच्या प्रयत्नात धोनी 88 चेंडूत 79 धावा काढून बाद झाला, पण तोपर्यंत भारताने समाधानकारक धावसंख्या उभारली होती.
एकवेळ दोनशे धावाही फलकावर लागतात की नाही असं वाटत असताना दोघांनी केलेल्या जबरदस्त भागीदारीने भारताचा डाव केवळ सावरला नाही तर त्याला योग्य आकार दिला. दरम्यान, अष्टपैलू हार्दिक पांड्याने तुफानी फटकेबाजी केली. त्याने अॅडम झम्पाच्या एकाच षटकात 24 धावा वसूल करत आपले अर्धशतक पूर्ण केले.
तत्पूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे (5), कर्णधार विराट कोहली (0), मनीष पांडे (0) आणि रोहित शर्मा (28) हे झटपट बाद झाल्याने 16 व्या षटकात भारताची अवस्था 4 बाद 64 अशी झाली होती. त्यानंतर एक बाजू लावून धरणारा केदार जाधवही 40 धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था दयनिय झाली होती.
अंतिम 11मध्ये भारतीय संघात अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पांड्याला संधी देण्यात आली आहे. तर गोलंदाजीत भुवनेश्वर आणि बुमराहवर विश्वास कायम ठेवला आहे. तर कुलदिप यादव आणि चहलवर फिरकीची जबाबदारी असेल. रोहित शर्मा -आजिंक्य रहाणे सलामीला येतील.
श्रीलंकेचा सफाया केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या विराट सेना आता सामना कांगारुंशी होत आहे. पाच वन-डे सामन्याच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान क्रिकेट मैदानावर चुरस दिसून आली. कसोटी मालिकेत उभय संघांतील खेळाडूंचा उत्साह अनुभवायला मिळाला. त्यात भारताने २-१ ने सरशी साधली होती.
ऑस्ट्रेलियाचा ५-० ने पराभव केला, तर भारताला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावता येईल, तर ४-१ ने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थान पटकावेल. ऑस्ट्रेलिया संघ दोन अव्वल वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क व जोश हेजलवूड यांच्याशिवाय येथे आला असला तरी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांच्या उपस्थितीत पाहुणा संघ आक्रमक आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी भारत हे दुसरे घर असल्याप्रमाणेच आहे. उभय संघांनी सामन्यापूर्वी कसून सराव केला आहे.
उभय संघ येथे तीन दशकांनंतर वन-डे सामना खेळत आहेत. येथे १९८७ मध्ये रिलायन्स विश्वकप स्पर्धेत उभय संघांदरम्यान अखेरचा वन-डे सामना खेळला गेला होता. त्यात ऑस्ट्रेलियाने एका धावेने विजय मिळवला होता. आॅस्ट्रेलियाने भारतात अखेरची द्विपक्षीय मालिका २०१३ मध्ये खेळली होती. सात सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे दोन सामने खराब वातावरणामुळे रद्द झाले होते.
(फोटो-बीसीसीआय)
Web Title: After the interruption of rain, Australia has put a lot of pressure on the Kangaroos, Indian bowlers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.