Prithvi Shaw Duck in Syed Mushtaq Ali Trophy : भारतीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सध्या बॅड पॅचचा सामना करत आहे. मेगा लिलावात स्वत: आपली किंमत कमी करूनही त्याला कुणी भाव दिला नाही. अनसोल्डचा टॅग माथा लालेल्या पृथ्वी शॉला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करून दाखवण्याची संधी होती. पण मुंबईच्या संघात स्थान मिळवल्यावर तो सातत्याने अपयशी ठरताना दिसते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मुंबईच्या डावाला दमदार सुरुवात करुन देण्यास तो पुन्हा कमी पडला. सर्विसेस विरुद्धच्या सामन्यात ३ चेंडू खेळूनही त्याला खाते उघडता आले नाही. या स्पर्धेत त्याच्या पदरी दुसऱ्यांदा भोपळा आला आहे.
पाच डावात कशी राहिलीये पृथ्वी शॉची कामगिरी
सर्विसेस विरुद्धच्या सामन्यात सर्विसेसच्या ताफ्यातून खेळणाऱ्या पुनियाने पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पृथ्वीला तंबूचा रस्ता दाखवला. या स्पर्धेतील पाच डावात पृथ्वीनं ०, ४०, २३, ० आणि ३३ अशा धावा केल्या आहेत. रणजी करंडक स्पर्धेतून मुंबईच्या संघातून त्याचा पत्ता कट झाला होता. शॉर्ट फॉर्मटमध्ये पुन्हा त्याला एक संधी देण्यात आली, पण तो काही हिंमत दाखवायला तयार नाही. ज्या पृथ्वीनं टीम इंडियाकडून पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती तो सध्या देशांतर्गत संघातील आपलं स्थानही गमावण्याच्या परिस्थितीत आहे.
IPL २०२५ च्या मेगा लिलावात लागला अनसोल्डचा टॅग
पृथ्वी शॉ हा स्फोटक फलंदाजी करण्यात माहिर आहे. टीम इंडियातून आउट झाल्यावर आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला. या IPL फ्रँचायझी संघानं त्याला खूप संधी दिली. पण तो कामगिरीतील सातत्याच्या अभावासह फ्रँचायझीला निराश करत राहिला. परिणामी संघाने मेगा लिलावाआधी त्याला रिलीज केले. मेगा लिलावात त्याने ७५ लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. याआधीच्या हंगामात कोट्यवधीत खेळणारा या गड्यानं स्वत:ची किंमत कमी केली. पण तरीही त्याला मेगा लिलावात भाव मिळाला नाही. कोणत्याही फ्रँचायझी संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. देशांतर्गत स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहिली तर फ्रँचायझींचा निर्णय एकदम उत्तम होतो, असेच म्हणावे लागेल.
वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा मार्गही बंद
एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यावर अनसोल्ड खेळाडूला आयपीएमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळू शकते. पण पृथ्वीचा खराब फॉर्म पाहता, यासाठीही तो पात्र ठरणार नाही, असेच चित्र निर्माण झाले आहे.
Web Title: After IPL 2025 Auction Snub Prithvi Shaw Registers Another Duck in Syed Mushtaq Ali Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.