T20 World Cup 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेणारा रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळता येणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्या समावेशाबाबतही साशंकता आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.
आशिया चषक स्पर्धेत जडेजा पाकिस्तान व हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात खेळला होता आणि त्याच्या समावेशामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर स्थिरता आली होती, परंतु आता त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार आहे. ''जडेजाच्या उजव्या गुडघ्याची दुखापत गंभीर आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला त्याच्या दुखापतीवर NCA ची वैद्यकीय टीम उपचार करत आहे. त्याचे पुनरागमन कधी होईल, हे आताच सांगणे अवघड आहे,''असे BCCIच्या अधिकाऱ्याने PTI ला सांगितले