नवी दिल्ली, दि. 10 - लंकादहनानंतर बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवण्यात येणाऱ्या 5 वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन वन डेंसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोटेशन पॉलिसीनुसार फिरकीपटू रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर लंकेविरोधात विश्रांती देण्यात आलेले गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे. काही अपवाद वगळता श्रीलंका दौऱ्यातीलच संघ यावेळीही निवडण्यात आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला 17 सप्टेंबरपासून चेन्नईतून सुरुवात होणार आहे. तर पहिला सराव सामना 12 सप्टेंबरला चेन्नईत खेळवण्यात येईल.
असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल -
17 सप्टेंबर रोजी होणा-या ५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीसाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंची दुसरी तुकडी दाखल झाली आहे. स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यासह संघातील पाच अन्य खेळाडू ढाका येथून मुंबईमार्गे चेन्नईला पोहोचले. संघाचे मुख्य मार्गदर्शक डेरेन लेमन बांगलादेश मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाला गेले. सहायक मार्गदर्शक डेव्हिड साकेर भारताविरुद्धच्या वन डे, टी-२० सामन्यांसाठी संघाची जबाबदारी सांभाळतील.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिका जुन्याच नियमानुसार -
भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर या कालावधीत होणा-या क्रिकेट मालिकेत जुन्याच नियमांचा अवलंब होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे. नवे नियम न्यूझिलंडच्या भारत दौ-यापासून लागू होणार आहेत.
नव्या नियमांत आचारसंहिता, डीआरएसचा उपयोग आणि बॅटचा आकार आदींचा समावेश आहे. हे नियम १ आॅक्टोबरपासून लागू होणार होते पण दोन कसोटी सामने २८ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने हा निर्णय बदलण्यात आला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच वन डे आणि तीन टी-२० सामने खेळविले जातील. स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला, नव्या नियमात पायचितच्या रेफ्रल पद्धतीत बदल करण्यात आला आहे. पंचासोबत गैरव्यवहार करणा-या खेळाडूला मैदानाबाहेर पाठविण्याचा अधिकार देखील आहे.
Web Title: After the Lanka series, now India's selection for the Kangaroo series, against Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.