मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघात फिरकीपटू आर. अश्विनला संधी देण्यात आली नाही. त्यानंतर आता अश्विनची आयपीएलमधील कारकिर्दही धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.
अश्विन हा किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार आहे. पण त्याचे पंजाबच्या संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात असून त्याला संघातूनही डच्चू देण्यात असल्याचे वृत्त आहे. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
पंजाबच्या संघाची एक बैठक या आठवड्याच्या शेवटी होणार आहे. या बैठकीमध्ये अश्विनला संघात न ठेवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. अश्विनला संघातून काढल्यावर आता संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे, या गोष्टीचा चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याचे समजते आहे.
सध्याच्या घडीला अश्विन हा भारताच्या ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय संघात नाही. अश्विन हा फक्त भारताच्या कसोटी संघात आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता भारताच्या संघात अश्विन दिसणार की नाही, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
अश्विनला संघात न घेतल्यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावर शुक्रवारी जोरदार टीका केली होती. आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध अश्विनची कामगिरी जबरदस्त राहीलेली आहे. दमदार कामगिरी असताना अश्विनला संघात का घेण्यात आले नाही, हा सवाल त्यांनी कोहली आणि शास्त्री यांच्यासह संघ व्यवस्थापनाला विचारला आहे.
समालोचन करताना गावस्कर कोहलीवर आणि रवी शास्त्री यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला, त्यावर गावस्कर रागावलेले पाहायला मिळाले.
गावस्कर म्हणाले की, " वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. आर. अश्विनचा आतापर्यंत चांगला रेकॉर्ड राहीलेला आहे, त्याचबरोबर वेस्ट इंडिजबरोबर त्याची कामगिरी उजवी राहीलेली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान न देणे, हे धक्कादायक आहे."
अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 कसोटी सामन्यांमध्ये 552 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 60 बळीही मिळवले आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त कामगिरी असताना अश्विनला संघाबाहेर ठेवणे गावस्कर यांना पटलेले दिसत नाही.