मुंबई : अलीकडेच भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिका पार पडली. मुंबईत झालेल्या या मालिकेत पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 4-1 ने मालिकेवर कब्जा केला. भारतीय संघाला मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवता आला होता. मालिकेतील सलामीच्या सामन्यात कांगारूच्या संघाने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली होती. मात्र त्यानंतरचे तिन्ही सामने जिंकून कांगारूच्या संघाने आपले वर्चस्व कायम राखले.
दरम्यान, भारतीय महिलांनी दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सुपर ओव्हरमध्ये विजयरथ रोखला. सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 4 धावांनी पराभव केला. भारताच्या विजयाची हिरो ठरली मराठमोळी स्मृती मानधना. तिने 49 चेंडूत 79 धावांची खेळी करून मालिका बरोबरीत केली होती. मात्र अखेरचे सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. अशातच भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने तिच्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट केली आहे. खरं तर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन मोफत सामने पाहायला मिळाले. बीसीसीआयने महिला क्रिकेटला प्राधान्य देत हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.
स्मृती मानधनाने चाहत्यांचे केले कौतुक स्मृती मानधनाने मालिका गमावल्यानंतर चाहत्यांसाठी एक खास पोस्ट केली. "आमची सर्वोत्तम कामगिरी एवढी चांगली नव्हती, पण आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू. आमच्यासाठी ही मालिका खूप मोठा शिकण्याचा अनुभव आहे. तुम्हाला मोठ्या संख्येने बाहेर पडताना आणि तुम्ही आम्हाला पाठिंबा देता हे पाहून खूप आनंद झाला. आम्ही खूप कौतुक करतो. सर्वांना अभिमान वाटावा यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू", अशा शब्दांत स्मृती मानधनाने चाहत्यांचे आभार मानले.
ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.
नेट गोलंदाज - मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"