IPL 2023 । जयपूर : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने यजमान राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. लखनौच्या संघाने निसटता विजय मिळवल्यानंतर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते. एखादा सामना जिंकल्यानंतर नेहमी मोठ्या उत्साहात आनंद साजरा करणारा गंभीर काल शांत असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी त्याची फिरकी घेतली. खरं तर लखनौने काल १० धावांनी विजय मिळवून संजू सॅमसनच्या संघाला पराभवाची धूळ चारली.
अलीकडेच पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यानंतर गंभीरने जोरदार सेलिब्रेशन केले होते. विराटच्या संघाविरूद्धच्या विजयानंतर गंभीरने केलेले सेलिब्रेशन अन् कालचे सेलिब्रेशन पाहून नेटकऱ्यांनी माजी खेळाडूची फिरकी घेतली.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५४ धावा केल्या होत्या. कर्णधार लोकेश राहुल (३९) आणि काइल मेयर्स (५१) यांच्या खेळीच्या जोरावर लखनौने राजस्थानसमोर १५५ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले. १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान राजस्थानने शानदार सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४४) आणि जोस बटलर (४०) यांनी चांगली सुरूवात करून दिली. पण अखेरच्या काही षटकांमध्ये लखनौच्या गोलंदाजांनी कमाल केली. अखेर राजस्थानने २० षटकांत ६ बाद केवळ १४४ धावा केल्या आणि संघाला १० धावांनी पराभव पत्करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे राजस्थान रॉयल्सच्या पराभवाला रियान परागची धिमी खेळी जबाबदार असल्याचे अनेक जाणकार म्हणत आहेत.
लखनौचा १० धावांनी विजय रियान पराग सोळाव्या षटकात फलंदाजीसाठी आला. त्यावेळी संघाला विजयासाठी ५१ धावांची आवश्यकता होती. रियान पराग सामना राजस्थानच्या नावावर करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण त्याने १२ चेंडूत केवळ १५ धावा केल्या. म्हणजेच रियानने १० चेंडूत फक्त ५ धावा केल्या. अखेर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने १० धावांनी सामना आपल्या नावावर केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"