नवी दिल्ली : ‘करुण नायरला इंग्लंडमध्ये एकाही लढतीत खेळविले नाही आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या संघात त्याला संधी देण्यात न आल्यामुळे बरेच लोक नाराज आहेत, पण या खेळाडूला या निर्णयाचे कारण सांगण्यात आले आहे,’ असे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी सांगितले.
प्रसाद म्हणाले, ‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघाची निवड करण्यात आल्यानंतर मी स्वत: करुण नायरसोबत चर्चा केली. त्याला पुनरागमन करण्याच्या पद्धतीबाबत सांगितले. निवड समिती संवाद साधण्याच्या बाबतीत एकदम स्पष्ट आहे.’
कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे त्रिशतकी खेळी करणारा केवळ दुसरा खेळाडू असलेल्या करुणची इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झाली होती, पण अखेरच्या दोन कसोटी सामन्यांत संघात बदल करण्यात आला त्यावेळी हनुमा विहारीला संधी देण्यात आली. विहारीने अर्धशतक झळकावले व आपल्या आॅफ ब्रेक माºयाने सर्वांना प्रभावित केले.
करुणला संघात संधी न दिल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन खूश नसल्याचे सर्वांचे मत आहे. करुणने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले की, त्याच्यासोबत संघव्यवस्थापन किंवा निवड समितीने चर्चा केलेली नाही. दरम्यान, प्रसाद यांनी सांगितले की, ‘करुणला हा निर्णय का घेण्यात आला होता, हे स्पष्ट करण्यात आले आहे.’
माजी भारतीय यष्टिरक्षक प्रसाद म्हणाले, ‘संवाद साधणे या समितीची मजबूत बाजू आहे. कुठल्याही खेळाडूला दु:खद वृत्त देणे कठीण काम असते. त्याला वगळण्याचे स्पष्ट कारण असणे आवश्यक असते. ते कारण त्या खेळाडूला पटेलच, असे नाही.’
प्रसाद पुढे म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये नायरची अंतिम संघात निवड झाली नव्हती, त्यावेळी माझे सहकारी देवांग गांधी यांनी त्याच्यासोबत चर्चा केली होती. त्याला संधीची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता.’ (वृत्तसंस्था)
चांगल्या कामगिरीचा सल्ला
करुणबाबत निर्णय घेण्यामागचे कारण स्पष्ट करताना प्रसाद म्हणाले,‘त्याला रणजी स्पर्धेत धावा फटकावणे सुरू ठेवावे लागेल. त्यानंतर भारत ‘अ’ मालिकेत सातत्य राखावे लागेल. कसोटी क्रिकेटच्या भविष्यातील योजनात त्याचा समावेश आहे. सध्या त्याला स्थानिक व भारत ‘अ’ सामन्यांत चांगली कामगिरी करण्याचा सल्ला दिला आहे.’
Web Title: After the match against the West Indies, he had a detailed discussion with Nayar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.