अटीतटीच्या झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर विश्वविजेता भारतीय संघ आज सकाळी भारतात दाखल झाले. मायदेशात परतल्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी भेटीची औपचारिकता पार पडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू व संघव्यवस्थापन यांच्यात मनमोकळ्या अनौपचारिक गप्पा रंगल्या. या भेटीचे व्हिडीओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहल याची खास चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.
आज सकाळी राजधानी दिल्लीत दाखल झाल्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी ७ लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला. तेथे नरेंद्र मोदी आणि विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची भेट झाली. यावेळी पंतप्रधानांनी अनौपचारिक गप्पांमध्ये भारतीय खेळाडूंना स्पर्धेदरम्यानचे अनुभव विचारले. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलकडे इशारा करत ‘हाच का तो भारतीय क्रिकेट संघामधील खोडकर मुलगा’,अशी विचारणा केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर बार्बाडोस येथे आलेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथेच अडकून राहावे लागले होते. दरम्यान, भारतीय संघ काल एअर इंडियाच्या एका विशेष विमानाद्वारे बार्बाडोस येथून रवाना झाला होता. त्यानंतर लांब पल्ल्याचा प्रवास करून भारतीय संघ आज सकाळी सहा वाजता दिल्ली येथे पोहोचला. तेथील हॉटेल मौर्या येथे काही काळ थांबल्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचला होता.