नवी दिल्ली : मागील काही काळापासून अनेक क्रिकेटपटूंनी व्यस्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता इंग्लंडच्या संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या अवघ्या ३ दिवसांनंतर ऑस्ट्रेलियासोबतच्या एकदिवसीय मालिकेवर (Aus Vs Eng ODI) नाराजी व्यक्त केली आहे. या वेळापत्रकावर भाष्य करताना तो म्हणाला, "खेळाडूंची ऊर्जा आणि फिटनेस राखणे हे मोठे आव्हान आहे." मात्र या अष्टपैलू खेळाडूच्या तक्रारीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने टीका केली आहे. मायकल क्लार्कने साधला निशाणा खेळाडूंच्या वेळापत्रकाचा वारंवार हवाला देऊन काय फायदा होणार नाही असे क्लार्कने म्हटले. इंग्लिश संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने विश्वचषक झाल्यानंतर ३ दिवसांतच होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेवर नाराजी व्यक्त केली होती. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने निशाणा साधला आहे. "जर विश्वचषकाच्या दुसऱ्याच दिवशी आयपीएलची फ्लाइट असती तर मला वाटत नाही की कोणत्याही खेळाडूने व्यस्त वेळापत्रकाबद्दल नाराजी व्यक्त केली असती किंवा तक्रार केली असती." खेळाडूंच्या सततच्या वर्कलोडच्या तक्रारीवरून क्लार्क चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले.
उद्यापासून रंगणार थरार खरं तर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात १३ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. इंग्लिश संघाने पाकिस्तानी संघाला ५ गडी राखून धूळ चारली आणि विश्वचषकाचा किताब पटकावला. आता इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्याच धरतीवर पराभूत करण्याचे आव्हान असेल. दोन्ही संघांमधील पहिला एकदिवसीय सामना १७ नोव्हेंबरला ॲडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. विश्वचषक जिंकल्यानंतर जोस बटलर आणि इंग्लिश संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. पण त्यांच्यासमोर कांगारूच्या संघाचे कडवे आव्हान असणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"