नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसिन जहाँने अनैतिक संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर शमीची कारकिर्द धोक्यात आली आहे. शमीनंतर एका क्रिकेटपटूवर त्याच्या पत्नीने असेच काहीसे गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे या क्रिकेटपटूची कारकिर्द संपुष्टात येऊ शकते, असे बोलले जात आहे.
' या ' क्रिकेटपटूच्या पत्नीने घरगुती हिंसाचार आणि हुंडा, असे दोन आरोप केले आहेत. ' या ' क्रिकेटपटूने पत्नीच्या घरच्यांकडून दहा लाख रुपयाचा हुंडा मागितला होता. घरच्यांनी हुंडा देण्यास नकार दिल्यावर त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर 15 ऑगस्टला त्याने पत्नीला घराबाहेर काढले. त्यानंतर पत्नीने ' या ' क्रिकेटपटूविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या चौकशीमध्ये जर क्रिकेटपटू दोषी आढळला तर त्याची कारकिर्द धोक्यात येऊ शकते.
आता ' हा ' क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा क्रिकेटपटू म्हणजे बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मोसादेक हुसेन. त्याने नात्यातील एका बहिणीबरोबर निकाह केला होता, तिचे नाव आहे शर्मिल सकिरा उषा. लग्नानंतर हुसेनने तिच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. हुंडा मिळत नसल्याने त्याने तिला मारहाणही केली आणि आता तिला घराबाहेर काढले आहे. याविरोधात तक्रार झाल्यामुळे आता त्याची चौकशी होणार आहे. बांगलादेशचा संघ 13 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया चषकासाठी युएईमध्ये जाणार आहे. जर हुसेन या चौकशीमध्ये दोषी आढळला तर त्याला या स्पर्धेला जाता येणार नाही.