MI vs PBKS । मुंबई : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा १३ धावांनी पराभव केला. पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईच्या संघावर विविध स्तरातून टीका होत आहे. खरं तर १५ षटकांपर्यंत पंजाब किंग्जच्या संघाने ४ बाद ११८ धावा केल्या होत्या. यानंतर अर्जुन तेंडुलकर गोलंदाजीला आला आणि त्याने आपल्या एकाच षटकात ३१ धावा दिल्या. यानंतर पंजाब किंग्जच्या फलंदाजांना गती मिळाली आणि त्यांनी २० षटकांत २१४ धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत पंजाबने जवळपास १०० धावा केल्या आणि अखेरीस या धावा मुंबई इंडियन्सला महागात पडल्या.
पंजाबविरूद्धच्या पराभवासाठी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी त्यांच्या गोलंदाजांना जबाबदार धरले, ज्यांनी पंजाबला अखेरच्या पाच षटकांत तब्बल 96 धावा दिल्या आणि प्रतिस्पर्धी संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद २१४ धावा केल्या.
मुंबईच्या प्रशिक्षकांनी अर्जुनेची केली पाठराखण
अर्जुन तेंडुलकरच्या खराब कामगिरीनंतर संघाचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी एक मोठे विधान केले आहे. कालच्या सामन्याबद्दल बोलताना मुंबईच्या प्रशिक्षकांनी म्हटले, "१५ व्या षटकापर्यंत सर्व गोष्टी नियंत्रणात होत्या आणि १६ वे षटक टाकण्यासाठी अर्जुन आला अन् सामना बदलत गेला. आम्ही पंधराव्या षटकापर्यंत सामना नियंत्रणात ठेवला होता पण नंतर शेवटच्या पाच षटकात ९६ धावा गेल्या. हे नक्कीच निराशाजनक आहे. तसेच अर्जुनने एका षटकात ३१ तर ३ षटकांत ४८ धावा दिल्या. रोहित हा खूप अनुभवी क्रिकेटपटू आहे आणि त्याला वाटत होते की अर्जुन 14 वे किंवा 15 वे षटक टाकू शकतो. कधी निर्णय आपल्या बाजूने जातो तर कधी नाही, ट्वेंटी-२० मध्ये हे असेच घडत असते. अर्जुन यातून शिकून पुढे जाईल."
पंजाबने मुंबईचा विजयरथ रोखला
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा १३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून २१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात केवळ २०१ धावाच करू शकला. अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. सलग ३ सामने जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला पराभूत करून पंजाब किंग्जने यजमानांचा विजयरथ रोखला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: After Mumbai Indians lost by 13 runs in MI vs PBKS, team coach Mark Boucher criticized the bowlers and said that Arjun Tendulkar will learn from this
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.