LSG vs MI | लखनौ : आयपीएल २०२३ चा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. काल झालेल्या सामन्यात लखनौने मुंबईला पराभवाची धूळ चारून प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर पराभवामुळे मुंबईचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. पराभवानंतर मुंबईचे प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनी संघाच्या गोलंदाजांना धारेवर धरले. मुंबईच्या गोलंदाजांनी नियोजनानुसार गोलंदाजी केली नसल्याचे प्रशिक्षक बॉन्ड यांनी म्हटले आहे.
शेन बॉन्ड यांच्या म्हणण्यानुसार, मैदानात उतरण्यापूर्वीच प्लान करण्यात आला होता की, कोणत्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करायची आहे. पण तरीदेखील मुंबईच्या गोलंदाजांनी तशी गोलंदाजी केली नाही. लखनौचा स्फोटक फलंदाज मार्कस स्टॉयनिसने शानदार खेळी करून मुंबईच्या गोलंदाजांना घाम फोडला. स्टॉयनिसने ४७ चेंडूत ८९ धावा करून मुंबईसमोर सन्मानजनक आव्हान उभे केले.
"आम्ही स्टॉयनिसविरूद्ध चांगली गोलंदाजी केली नाही"सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शेन बॉन्ड यांनी संघाच्या गोलंदाजीवर नाराजी व्यक्त केली. "आमच्या गोलंदाजांनी नियोजनानुसार गोलंदाजी केली नाही, ही सर्वात निराशाजनक बाब आहे. या खेळपट्टीवर स्टॉयनिससारख्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करायची याचा आम्ही प्लान आखला होता. पण त्या प्लाननुसार गोलंदाजी झाली नाही. स्टॉयनिसला जिथे शॉर्ट मारायचे होते तिथेच गोलंदाजी होत होती. तो सरळ शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि आम्ही देखील तिथेच गोलंदाजी केली. तसेच अखेरची चार षटके आम्हाला महागात पडली", असे बॉन्ड यांनी सांगितले.
क्रिकेटच्या 'दादा'च्या सुरक्षेत मोठी वाढ; पश्चिम बंगाल सरकारनं घेतला निर्णय
मुंबईचा ५ धावांनी पराभवलखनौ सुपर जायंट्सने आपल्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला पाच धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना यजमान लखनौने निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ ५ गडी गमावून केवळ १७२ धावा करू शकला.