नवी दिल्ली - भारताने आपला दुसरा डाव पाच बाद 246 धावांवर घोषित केला असून श्रीलंकेसमोर विजयासाठी 410 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दुस-या डावात भारताकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक (67), चेतेश्वर पूजारा (49), कर्णधार विराट कोहली (50) आणि रोहित शर्माने नाबाद (50) धावा केल्या. भारताच्या दुस-या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मुरली विजयच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. लकमलने विजयला (9) धावांवर डिकवेलाकरवी झेलबाद केले.
अजिंक्य रहाणे दुस-या डावातही अपयशी ठरला. त्याला (10) धावांवर परेराने संदाकानकरवी झेलबाद केले. शिखर धवन (67) आणि चेतेश्वर पूजाराने (49) डाव सावरला. दोघांनी तिस-या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. धवनला (67) धावांवर संदाकानने डिकवेलाकरवी झेलबाद केले. पूजाराचे अर्धशतक अवघ्या एक धावेने हुकले पूजारा (49) धावांवर बाद झाला.
श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताला 163 धावांची आघाडी मिळाली होती. कसोटीच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात कर्णधार दिनेश चांदीमल (164) धावांवर बाद झाला आणि श्रीलंकेचा डाव संपुष्टात आला. चांदीमलला इशांत शर्माने शिखर धवनकरवी झेलबाद केले. भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. मालिकेतील हा तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना आहे. भारताकडे मालिकेत 1-0 अशी आघाडी आहे.
भारतीय संघ फलंदाजीला मैदानात उतरला असून सलामीवीर मुरली विजयच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेची जोडी मैदानावर आहे. भारताकडे आता 180 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. श्रीलंकेचा संघ ३ बाद ७५ धावांवर अडचणीत असताना अँजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चांदीमलने शतकी खेळी करुन श्रीलंकेला फॉलोऑनच्या संकटातून वाचवले.
चांदीमल आणि मॅथ्यूजने चौथ्या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारी केली. सोमवारी अखेरच्या सत्रात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेची पहिल्या डावात ९ बाद ३५६ अशी अवस्था करताना सामन्यावर वर्चस्व मिळवले. मॅथ्यूजने वैयक्तिक ६, ९३, ९८ व १०४ धावसंख्येवर मिळालेल्या जीवदानांचा लाभ घेत सहा तासांपेक्षा अधिक वेळ फलंदाजी करीत २६८ चेंडूंच्या खेळीमध्ये १४ चौकार व २ षटकार लगावले.
मॅथ्यूजचे तीन झेल यष्टिपाठी सुटले. दक्षिण आफ्रिका दौ-यापूर्वी भारतीय संघासाठी ही चिंतेची बाब आहे.भारतातर्फे ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने तीन, इशांत शर्माने तीन, मोहम्मद शामी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.