लंका प्रीमिअर लीगमध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने शतक ठोकून ऐतिहासिक कामगिरी केली. सोमवारी त्याने कोलंबो स्ट्रायकर संघाकडून खणखणीत शतक झळकावले आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधील युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो जगातला दुसरा फलंदाज ठरला आहे. लक्षणीय बाब म्हणजे ट्वेंटी-२० मध्ये दहा शतके झळकावणारा बाबर हा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना गाले टायटन्सने ३ बाद १८८ धावा केल्या. लसिथ क्रूस्पूल (३६) व शेव्हॉन डॅनिएल (४९) यांनी संघाला चांगली सलामी करून दिली. भानुका राजपक्षा (३०) यानेही चांगला खेळ केला. टीम सेइफर्टने ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या. स्ट्रायकरच्या नसीम शाह, रमेश मेंडीस व लक्षण संदकन यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
१८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझमने शतकी खेळी केली. पथून निसंका व बाबर आझम यांनी स्फोटक खेळी केली. दोघांनी १२.३ षटकांत १११ धावांची भागीदारी केली. निसंका ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावा केल्या. त्यानंतर स्ट्रायकरचा नुवानिंदू फर्नांडो ( ८) लगेच बाद झाला. पण, बाबरने मोर्चा सांभाळला. त्याने ५९ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०४ धावांची खेळी केली.
आपल्या संघाच्या कर्णधाराने शतक ठोकताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी एकच जल्लोष केला. समालोचन करत असलेले राजा यांनी बाबर आझमचे कौतुक करताना एक अजब विधान केले. बाबरने शतक झळकावताच राजा यांनी समालोचन करताना म्हटले, "माझे खरंच त्याच्यावर प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे." राजा यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.