पाकिस्तानी संघ ट्वेंटी-२० विश्वचषकात काही खास कामगिरी करू शकला नाही. अमेरिका आणि मग भारतीय संघाकडून झालेल्या पराभवामुळे शेजाऱ्यांना सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवता आला नाही. त्यातच अमेरिका आणि आयर्लंड यांच्या सामन्यात पाऊस आला अन् पाकिस्तान वाहून गेला. सततच्या पराभवांमुळे पाकिस्तानी संघासह पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अशातच संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) यांनी पराभवाचे कारण सांगताना बाबर आझमच्या संघातील काही त्रुटी आवर्जुन सांगितल्या.
पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानी संघातील वाद जगासमोर आणला आणि खेळाडूंचे वाभाडे काढले. कर्स्टन यांच्या त्या विधानानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने तिथे वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही, भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यासाठी या, असा सल्ला देऊन एका दगडात दोन पक्षी मारले. आता इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल वॉनने पाकिस्तानवर बोचरी टीका केली.
पाकिस्तानचे प्रशिक्षक काय म्हणाले?
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कस्टर्न म्हणाले की, पाकिस्तानच्या संघात एकता नाही. काही खेळाडू एकमेकांशी बोलत देखील नाहीत. प्रत्येकाची दिशा वेगवेगळी आहे. याचा फटका संघाला बसला. ते कोणाचेच ऐकत नाहीत. मी आतापर्यंत अनेक संघांसोबत काम केले आहे. पण, कोणत्याच संघात अशी परिस्थिती पाहिली नाही. यावर व्यक्त होताना इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल वॉनने म्हटले की, खंबीर राहा, पण मला वाटते की, गॅरी जे म्हणत आहे ते खरोखर योग्य आहे.