नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानची कोंडी कशी करता येईल, याचाच विचार सध्या भारतात सुरु आहे. त्यानुसारच हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या लीगचे भारतामध्ये प्रसारण डीस्पोर्ट हे चॅनेल करत आहे. पण आता हल्ल्यानंतर डीस्पोर्टने पीएसएलचे प्रसारण भारतामध्ये न करण्याच निर्णय घेतला आहे.
यंदा पीएसएलचा हा चौथा मोसम आहे. यावेळी ही लीग दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये सहा संघ खेळणार असून जगातील बरेच नामावंत खेळाडू या लीगमध्ये खेळणार आहेत. या लीगमधील अखेरचे काही सामने पाकिस्तानात खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या भारताकडून पीएसएलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.
डीस्पोर्टच्या एका अधिकाऱ्यांनी मुंबई मिरर या वृत्तपत्राला सांगितले की, " पीएसएल या लीगचे प्रसारण आम्ही बंद करत आहोत. हे प्रसारण आम्ही शुक्रवारीच बंद करणार होतो. पण काही तांत्रिक गोष्टींमुळे आमचा वेळ वाया गेला. आता भारतामध्ये पाकिस्तानमधील लीग दिसणार नाही, ही जबाबदारी आमची असेल. "
क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही भारताने पाकिस्तानशी खेळू नये; नेटकऱ्यांची तीव्र भावना
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात (Pulawama Terror Attack) भारताचे 38 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. पाकिस्तानला जशासतसे उत्तर द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. क्रिकेटपटूंसह भारताच्या अन्य खेळाडूंनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधही पूर्णपणे तोडून टाकावे अशी मागणी होत आहे. पाकिस्तानशी असलेले राजकीय संबंध पाहता दोन्ही देशांत क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीच, परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. पण, आता पाकिस्तान संघाविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत खेळण्याची आवश्यकता नाही, अशा तीव्र भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २००७ सालापासून एकही मालिका खेळवण्यात आलेली नाही. यापूर्वी बीसीसीआय आणि पीसीबी या दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये मालिका खेळवण्याचा करार झाला होता. पण भारतामध्ये झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरून बीसीसीआयने पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला होता. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानबरोबर खेळण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच पाकिस्तानबरोबर क्रिकेट मालिका खेळणार असल्याचा पवित्रा बीसीसीआयने घेतला होता.
Web Title: After the Pulwama attack, pakistan super league telecast suspended in India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.