रांची कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय नोंदवल्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केले. मात्र त्याचे एक विधान चर्चेत राहिले. रोहितने इशान किशन किंवा श्रेयस अय्यरचे प्रत्यक्ष नाव घेतले नाही. मात्र त्याच्या विधानाचा थेट अर्थ असा घेतला जात आहे की, रोहित शर्माने या दोन्ही खेळाडूंना कडक इशारा दिला आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला प्राधान्य न देणाऱ्या खेळाडूंवरही जोरदार हल्लाबोल केला आहे.
रांचीमध्ये भारताने इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली. यानंतर त्याने सरफराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप या खेळाडूंचे कौतुक केले. रोहित म्हणाला, कसोटी हा सर्वात कठीण फॉरमॅट आहे. कसोटी क्रिकेटची भूक नसलेल्या खेळाडूंकडे पाहूनच सांगता येईल. खूप मेहनत करणाऱ्यांसाठी कसोटी क्रिकेट आहे. आम्हाला अशा खेळाडूंची गरज आहे, जे वैयक्तिक कामगिरीत संघाला पुढे ठेवतात. या मालिकेपूर्वी अनेक खेळाडू गायब होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल मला बोलायचे नाही, असं रोहितने सांगितले.
रोहित म्हणाला की, युवा खेळाडूंना सतत सल्ला देण्याची गरज नाही तर चागली कामगिरी करता यावी यासाठी संधी आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ही फार कठीण मालिका असल्याने विजयाचा आनंद वाटतो. युवा खेळाडूंनी हे आव्हान स्वीकारले आणि विजयात योगदानही दिले. सर्वच युवा चेहऱ्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, याची जाणीव आहेच, प्रमुख खेळाडूची अनुपस्थिती चांगली नसेल, मात्र त्यांचे स्थान घेणाऱ्यांनी तितक्याच तोलामोलाची कामगिरी केली, हे नजरेआड करता येणार नाही, असंही रोहित म्हणाला.
ईशान किशन आणि श्रेयस अय्यरने स्थानिक क्रिकेटकडे पाठ फिरविली-
दरम्यान, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी स्थानिक क्रिकेटकडे पाठ फिरविली. ईशान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ईशानला स्थानिक सामने खेळण्याचा सल्ला दिला. यादरम्यान खेळाडू आणि व्यवस्थापनात काही बिनसले का? याचीही चर्चा झाली. द्रविडचा सल्ला धुडकावून ईशान थेट हार्दिक पांड्यासोबत सराव करायला गेला. श्रेयस अय्यरने इंग्लंडविरुद्ध सुरुवातीला कसोटी खेळल्यानंतर पाठदुखीचे कारण पुढे केले. त्यामुळे पुढील तीन कसोटींसाठी त्याच्या नावाचा विचार न करता ‘बीसीसीआय’ने त्याला ‘एनसीए’त उपचार घेण्यास सांगितले होते. ‘एनसीए’च्या अहवालात श्रेयस चक्क फिट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही त्याने मुंबईकडून रणजी सामना खेळण्याचे टाळले. आयपीएल डोळ्यापुढे ठेवूनच त्याने हे केले असावे. यात नुकसान तर खेळाडूंचेच आहे.