मुंबई : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला भारताच्या संघ व्यवस्थापनाने बऱ्याच फलंदाजांना डावलून बऱ्याच संधी देण्यात आल्या. पण पंत सातत्याने नापास होत असल्याने त्याला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पंतला तंबी दिली होती. आता आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी भारताकडून चौथ्या क्रमांकावर कोण, हा प्रश्न भारतीय संघाला पडला आहे. पण या गोष्टीमध्ये आता उडी घेतली आहे ती सुरेश रैनाने. रैना हा बऱ्याच कालावधीपासून भारतीय संघात नाही. पण यापूर्वी रैनाने भारताकडून चौथ्या क्रमांकावर खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता रैनाला चौथ्या क्रमांकासाठी संधी देणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित राहीला आहे.
रैना हा भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघामध्ये नाही. पण आता संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी रैना उत्सुक आहे. याबाबत रैना म्हणाला की, "मी भारतासाठी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज होऊ शकतो. मी यापूर्वीही भारताकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे आणि माझ्याकडून चांगली कामगिरीही झाली आहे. आता काही महिन्यांमध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. ही माझ्यासाठी चांगली संधी असून मी या संधीची वाट पाहत आहे."
भारताने चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडूची निवड केली होती. रायुडूने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली होती. पण विश्वचषकाच्या संघाची निवड करण्यात आली तेव्हा रायुडूला संधी देण्यात आली नव्हती. रायुडूला डावलून पंतला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. पण पंत या क्रमांकावर फलंदाजी करत असताना नापास ठरला होता. विश्वचषकात सुरुवातीला ही जबाबदारी विजय शंकरवर सोपवण्यात आली होती. शंकर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. पण विश्वचषकात शंकर हा दुखापग्रस्त झाला आणि त्याच्याजागी पंतला संधी देण्यात आली होती.
पंतच्या फलंदाजीबाबत रैना म्हणाला की, " पंत हा बऱ्याचवेळा संभ्रमात असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण पंत हा आपला नैसर्गीक खेळ करताना दिसत नाही. बऱ्याचदा पंत हा बचावामध्ये नापास झालेला पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर एकेरी-दुहेरी धावा घेणेही पंतला जमलेले नाही. त्यामुळे पंतबरोबर संघातील वरीष्ठ खेळाडूंना चर्चा करायला हवी. महेंद्रसिंग धोनी हे काम चांगले करतो. क्रिकेट हा मानसीकतेचा खेळ आहे. त्यामुळे पंतला आक्रमक खेळण्यासाठी संघाने मुभा द्यायला हवी. सध्याच्या घडीला पंत हा दबावाखाली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे पंतवर जास्त दबाव टाकणे चुकीचे आहे. त्याला स्वत: चा खेळ करायला द्यायला हवा."