लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या वाढदिवसाला चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे आभार मानताना सामाजिक संदेशही दिला होता. सध्याच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना प्लाझ्मा मिळवण्यासही अडचणी भासत आहेत. यामुळेच सचिनने आपल्या वाढदिवसाला सामाजिक संदेश देताना चाहत्यांना रक्तदान आणि प्लाझ्मा दानसाठी पुढे यावं असे आवाहन केले होते. यानंतर पुण्याची महिला क्रिकेटपटू तेजल हसबनिस हिने पुढाकार घेत सचिनच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून सध्या पुण्यात ती रक्तदान आणि प्लाझ्मा दानसाठी जनजागृती करत आहे.
देशांतर्गत स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळणाºया तेजलने कोरोनाकाळात रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. सचिनने रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केल्यानंतर तेजलने स्वत: रक्तदान केलेच, मात्र यासोबतच तिने अनेक पुणेकरांनाही रक्तदानासाठी तयार केले. आपले कर्तव्य या संस्थेसोबत काम करत तेजलने अनेक कॉलेजेसचीही मदत केली. अनेक कॉलेजेसच्या वतीने होणाºया रक्तदान शिबीरांची माहिती तिने नागरिकांमध्ये पोहचवण्याचे काम केले. शिखर धवनची मोठी घोषणा; 'Mission Oxygen'साठी २० लाखांसह IPLमध्ये मिळणारी सर्व बक्षीस रक्कम करणार दान
या सामाजिक कार्याबाबत तेजलने सांगितले की, ‘सध्या या बिकट परिस्थितीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज लसीकरण मोहिम जोर धरत आहे. १ मे नंतर १८ वर्षांवरील सर्वांना लस घेता येईल. मात्र एकदा का लस घेतली, तर पुढील किमान ६० दिवस कोणीही रक्तदान करु शकणार नाही. त्यामुळे शक्य होईल, तितक्या जास्त लोकांना लस घेण्याआधी रक्तदान करण्याबाबत जागृत करायचे आहे.’
या कामासाठी सचिन तेंडुलकरकडून प्रोत्साहन मिळाल्याचे सांगत तेजल म्हणाली की, ‘सचिन तेंडुलकर सरांनी आपल्या वाढदिवशी सोशल मेसेज देताना रक्तदानासाठी आवाहन केले. यानंतर मी पुढाकार घेतला आणि माझ्या कुटुंबियांनीही मला पाठिंबा दिला. या कार्यासाठी मी परिचयातील सर्व युवांना तसेच, सहकारी क्रिकेटपटूंनाही रक्तदान करण्यास सांगितले आहे.’
तेजलने तीन फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले असून तिने २२ मर्यादित षटकांच्या सामन्यांतही छाप पाडली आहे. याशिवाय महिला टी-२० क्रिकेटमध्ये २२ सामने तेजले खेळले आहेत. सचिनने सुरु केलेल्या तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडेमीमध्ये पुण्यातील शिबिरात तेजलने युवा खेळाडूंना प्रशिक्षण दिले होते. जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या सिनियर वूमन्स चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ग्रीन संघात तेजलचा समावेश होता.
Web Title: After Sachin Tendulkar's message, a woman cricketer tejal hasabnis from Pune took the initiative to donate blood
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.