ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शनिवारी तडकाफडकी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हकालपट्टी केली. बीसीसीआयने नव्या निवड समितीसाठी अर्ज मागवले आहेत. आयसीसी स्पर्धेतील अपयशानंतर बीसीसीआय आता कठोर पाऊलं उचलण्याच्या पवित्र्यात दिसत आहेत आणि आता पुढील मोर्चा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) कडे वळणार असल्याची चर्चा आहे. रोहित शर्माकडून ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद नव्या कर्णधाराकडे सोपवण्याची तयारी सुरू असताना आता प्रशिक्षक बदलाचीही चर्चा सुरू आहे. BCCI लवकरच राहुल द्रविडसोबत याबाबत चर्चा करणार आहेत.
वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळा कर्णधार तसेच वेगवेगळे प्रशिक्षक अशी संकल्पना BCCI आणू पाहत आहेत. भारताला मागील दोन्ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला आहे आणि BCCIने २०२४ च्या वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात केली आहे. ''आणखी अपयश परवडणारे नाही. आता आम्हाला कोणताच धोका पत्करायचा नाही. ट्वेंटी-२०संघासाठी नव्या कर्णधार निवडण्याबाबत आम्ही रोहित शर्माशी चर्चा केली आहे आणि त्याची काहीच हरकत नाही. अशीच चर्चा राहुलसोबत करणार आहोत. त्याच्यावरील वर्क लोड कमी करणे, हा त्यामागचा हेतू आहे,''असेही BCCI च्या अधिकाऱ्याने सांगितले.
ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियात बरेच बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन, दिनेश कार्तिक आदी सीनियर्सना आता ट्वेंटी-२० संघापासून दूर ठेवण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यात २०२४च्या वर्ल्ड कपचा विचार लक्षात घेता युवा खेळाडूंचा संघ तयार करण्यावर भर असल्याची चर्चा आहे आणि त्यांचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात येणार आहे. हार्दिक व धोनी यांच्यातलं बॉडिंग फार चांगले आहे आणि त्यामुळेच महेंद्रसिंग धोनीला टीम इंडियाचा संचालक ( MS Dhoni Director of T20 Cricket) म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. धोनीच्या अनुभव व कौशल्य गुण युवा खेळाडूंना शिकता यावे यासाठी BCCI ची धडपड सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"