IND vs NZ Live Match Updates In Marathi | मुंबई : किंग कोहलीने नेहमीप्रमाणे 'विराट' खेळी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. न्यूझीलंडला पराभूत करून वन डे विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी आज टीम इंडिया मैदानात आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा बहुचर्चित सामना खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने २९ चेंडूत ४७ धावांची स्फोटक खेळी केली. त्यानंतर शुबमन गिलने (७९) धावांची अप्रतिम खेळी करून डाव पुढे नेला. पण दुखापतीमुळे गिलला मैदान सोडावे लागले अन् श्रेयस अय्यरचे खेळपट्टीवर आगमन झाले. विराट कोहलीने सावध खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली, तर अय्यरने आक्रमक पवित्रा धारण करून किंग कोहलीला चांगली साथ दिली. विराटने ११७ चेंडूत ११३ धावांची शतकी खेळी करून इतिहास रचला. वन डे विश्वचषकाच्या इतिहासात शतकांचे अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने विराटने चाहत्यांची मनं जिंकली.
दरम्यान, आजचा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. बॉलिवूड कलाकार, राजकीय मंडळी तसेच क्रिकेटपटूंचे कुटुंबीय देखील या महत्त्वाच्या सामन्याचे साक्षीदार झाले आहेत. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील हा सामन्याचा आनंद लुटताना दिसली. पती विराटच्या शतकानंतर दोघांनीही एकमेकांना फ्लाईंग किस दिला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला देखील विरूष्का एकमेकांना फ्लाईंग किस देत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ -केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिन कॉन्वे, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, मिचेल सॅंटनर, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट.