Join us  

Prithvi Shaw: "कधी-कधी खूप त्रास होतो...", त्रिशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉचे भावनिक विधान

prithvi shaw ranji trophy: पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना शानदार त्रिशतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 3:49 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगला आहे. मुंबई आणि आसाम यांच्यातील सामन्यात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने शानदार खेळी केली. पृथ्वी शॉमुंबईकडून फलंदाजी करताना दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. त्याने आसामविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावाच्या दुसऱ्या दिवशी त्रिशतक झळकावले, पण शॉ 400 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. आता त्रिशतक झळकावल्यानंतर या स्फोटक फलंदाजाने एक भावनिक विधान केले आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना खेळवला जात आहे, ज्यामध्ये मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ताबडतोब खेळी केली. पृथ्वीने दुसऱ्या दिवशी त्रिशतक झळकावले पण त्याला 400 धावांचा आकडा गाठण्यात अपयश आले. पृथ्वी शॉने 383 चेंडूत 379 धावांची शानदार खेळी केली. खरं तर मुंबईच्या संघाने आपल्या पहिल्या डावात 138.4 षटकांत 4 बाद तब्बल 687 धावा केल्या आहेत. यामध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या 191 धावांचा मोलाचा वाटा आहे.

त्रिशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉ भावुक  दरम्यान, त्रिशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉने स्पोर्ट्स स्टारशी संवाद साधला असता एक भावनिक विधान केले आहे. सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा कसा सामना करतोस असे विचारले असता त्याने हसत हसत म्हटले, "काय करू शकतो? सरळ दुर्लक्ष करतो. कोणी काय लिहिले किंवा बोलले याची मला चिंता नाही. जर मी बरोबर आहे तर सोशल मीडियावर कोणी काय म्हणत आहे याचा मला काही फरक पडत नाही." याशिवाय त्याने नकारात्मक गोष्टी आवडत नसल्याचे देखील म्हटले. "मी लोकांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे किंवा ऐकणे पसंत करणाऱ्यांपैकी नाही. कधी-कधी आपण जेव्हा आपल्याबाबत अशा काही गोष्टी पाहतो, ज्या खऱ्या नसतात तेव्हा खूप त्रास होतो", असे पृथ्वी शॉने अधिक सांगितले. 

पृथ्वी शॉने वेधले लक्ष खरं तर पहिल्या दिवसाअखेर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ नाबाद परतले होते. आज दुसऱ्या दिवसाची सुरूवात होताच रहाणेने आपले शतक तर पृथ्वीने त्रिशतक पूर्ण केले. मुख्तार हुसैन (1) आणि रियान पराग (2) वगळता आसामच्या कोणत्याच गोलंदाजाला यश मिळाले नाही. तर अरमान जाफरला धावबाद करण्यात आसामच्या संघाला यश आले. पृथ्वीने पहिल्या सत्राच्या अखेरीस शतक पूर्ण करून मुंबईला मजबूत स्थितीत नेले होते. खरं तर मुंबईचा संघ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीच्या रिंगणात उतरला आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :रणजी करंडकपृथ्वी शॉमुंबईआसामभारतीय क्रिकेट संघ
Open in App