मेलबर्न : आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २०२२च्या विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. इंग्लंडने पाच गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि विश्वचषकावर नाव कोरले. पाकिस्तानच्या ८ बाद १३७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. आदिल राशिद, सॅम करन, ख्रिस जॉर्डन या गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर बेन स्टोक्सने ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५२ धावा करून इंग्लंडचा विजय पक्का केला. एकदिवसीय आणि टी-२० असे दोन्ही वर्ल्ड कप जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला धीर देण्याचा प्रयत्न केला.
आजच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. इंग्लंडला टी-२० विश्वचषकाचा नवा चॅम्पियन होण्यासाठी १३८ धावांची आवश्यकता होती. बेन स्टोक्सने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने किताब पटकावला आहे. पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने इंग्लंडच्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.
शाहिन बाहेर गेला तो टर्निंग पॉइंट ठरला - अख्तर
"पाकिस्तानने विश्वचषक हरला असला तरी त्यांनी शानदार कामगिरी केली आहे. पाकिस्तानची गोलंदाजी शानदार होती, चमकदार कामगिरी केल्यामुळे विश्वचषक अविस्मरणीय झाला. शाहिन शाह आफ्रिदी बाहेर झाला तोच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्रास होत आहे, निराश आहे पण चांगली खेळी केल्याबद्दल अभिनंदन." अशा शब्दांत अख्तरने पाकिस्तानी संघाचे देखील कौतुक केले आहे. खरं तर पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे अखेरचे काही षटके खेळू शकला नाही.
पाकिस्तानचे फलंदाज अयशस्वी
पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ १३७ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. त्याच्या पाठोपाठ कर्णधार बाबर आझम ३२ धावांची साजेशी खेळी केली. तर शादाब खानने २० धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या तिघांशिवाय कोणत्याच पाकिस्तानी फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. सॅम करनने सर्वाधिक ३ बळी पटकावून पाकिस्तानला मोठे झटके दिले. आदिल राशिद आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. तर बेन स्टोक्सला १ बळी घेण्यात यश आले.
पाकिस्तानने ११ षटकांत २ बाद ८४ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ९ षटकांत त्यांनी ५३ धावांत ६ बळी गमावले. पाकिस्तानच्या १३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात शाहिन शाह आफ्रिदीला ( Shahin Afridi) दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले. इंग्लिश संघाने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा करून विजय मिळवला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ४९ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: After T20 World Cup Final ENG vs PAK Pakistan lost, Shoaib Akhtar has praised both teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.