mark boucher ipl, Mumbai Indians । मुंबई : काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने ७ गडी राखून मुंबई इंडियन्सचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेकडून अजिंक्य रहाणेने स्फोटक खेळी करून संघाचा विजय सोपा केला. रहाणेने २७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. मात्र, रहाणेच्या खेळीमुळे नाहीतर आमचा पराभव आमच्याच चुकांमुळे झाला असल्याची कबुली मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी दिली आहे.
खरं तर डेव्हॉन कॉन्वेचा अपवाद वगळता मुंबईच्या गोलंदाजांना सुरूवातीच्या षटकांमध्ये एकही बळी घेता आला नव्हता. मुंबईची खराब गोलंदाजी पराभवाला कारणीभूत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. अशातच संघाचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी यालाच दुजोरा देताना म्हटले, "आम्ही अपेक्षित धावा न केल्याने आमचे गोलंदाज आणि त्यांच्या फलंदाजांमध्ये म्हणावा तसा सामना राहिला नव्हता. त्यात ट्वेंटी-२० लीगमध्ये इम्पॅक्ट प्लेयर आल्याने आम्हाला आणखी अडचणीचा सामना करावा लागला. आमच्याकडे ७ प्रमुख फलंदाज होते पण ८ गडी गमावून १५७ धावसंख्या करणे हे एक अपयश होते. आम्हाला किमान १८० ते १९० तरी धावा करायला हव्या होत्या."
आमची गोलंदाजी खराब होती - मार्क बाउचर
"मोठी धावसंख्या असती आणि आमच्या गोलंदाजांनी चांगला प्रभाव टाकला असता तर निकाल वेगळा असता. अजिंक्य रहाणेने काही चांगले शॉर्ट्स खेळले. पण मला वाटते की, या खेळीमुळे नाहीतर आमच्या खराब गोलंदाजीमुळे आमचे अधिक नुकसान झाले. खराब गोलंदाजीने आम्हाला रहाणेच्या खेळीपेक्षा जास्त नुकसान पोहचवले", अशी कबुली मुंबईच्या प्रशिक्षकांनी दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरूवात खराब झाली होती. पहिल्याच षटकात दीपर चाहरला दुखापत झाली, तर पॉवरप्लेच्या ६ षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी ६१ धावा कुटल्या होत्या. मात्र, त्यानंतर चेन्नईच्या फिरकीपटूंनी कमाल करत जोरदार पुनरागमन केले. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर तुषार देशपांडे आणि मिचेल सॅंटनर यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या होत्या.
चेन्नईचा सलग दुसरा विजय
१५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला पहिल्या षटकात डेव्होन कॉन्वेच्या रूपात पहिला झटका बसला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या घरच्या मैदानावर मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रहाणेने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याला ऋतुराज गायकवाडने सावध खेळी करून चांगली साथ दिली. अखेर चेन्नईच्या संघाने १८.१ षटकांत १५९ धावा करून सामना आपल्या नावावर केला. यासह धोनीच्या संघाने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: After the defeat to Chennai Super Kings in IPL 2023, Mumbai Indians head coach Mark Boucher said, We lost because not of Ajinkya Rahane's innings because of poor bowling
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.