नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. सध्या सुपर-१२ मध्ये सर्वच संघ उपांत्यफेरी गाठण्यासाठी मैदानात आहेत. ग्रुप ए मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर ग्रुप बी मध्ये भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे नेदरलॅंड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. सुपर-१२ मध्ये सहभागी झालेल्या सर्व संघानी आतापर्यंत किमान एक सामना खेळला आहे. मात्र उपांत्यफेरीत प्रवेश मिळवण्यासाठी आतापासूनच उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात पावसामुळे इंग्लंडला नवख्या आयर्लंडविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला आणि उर्वरित सर्व सामने जिंकले, तर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठू शकणार नाही. याउलट पाकिस्तान आणि भारतीय संघाने आपले उर्वरित सामने जिंकले तर दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी समीकरण थोडे कठीण झाले आहे कारण त्यांना त्या सामन्यातून केवळ एकच गुण मिळाला आहे.
भारताला होणार फायदा
लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाला अंतिम ४ मध्ये जागा मिळवणे सोपे असणार आहे. जर भारताने पुढील चारपैकी तीन सामने जिंकले तर ते उपांत्य फेरीत सहज पोहोचतील. भारताचे सध्या दोन गुण आहेत आणि ते किमान तीन सामने जिंकल्यानंतर आठ गुणांवर पोहोचतील. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका किंवा पाकिस्तान यापैकी कोणताही एकच संघ गुणतालिकेत भारताला पराभूत करू शकतो.
ग्रुप ए बद्दल भाष्य करायचे झाले तर या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, आयर्लंड, इंग्लंड आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एक सामना गमावला आहे, त्यामुळे या देशांवरील दबाव खूप वाढला आहे. उपांत्यफेरीत प्रवेश मिळवण्यासाठी संघाना पाचमधील चार सामन्यात विजय मिळवावा लागेल. खरं तर तीन सामने जिंकूनही संघ उपांत्य फेरीचे तिकीट मिळवू शकतात. परंतु यासाठी त्यांना इतर निकालांवर अवलंबून राहावे लागेल. उदाहरणार्थ, मागील विश्वचषकात भारताने सुपर-१२ टप्प्यात तीन सामने जिंकले होते पण उपांत्य फेरीत प्रवेश मिळवू शकला नाही.
गुणतालिकेचा नियमआयसीसीच्या नियमांनुसार, प्रत्येक संघाला सुपर-१२ मध्ये एक विजय मिळवल्यावर २ गुण मिळतात. तर पराभूत संघाला शून्य गुण मिळतात. जर सामना बरोबरीत किंवा रद्द झाला तर दोन्ही संघाना १-१ गुण दिला जातो. असाच एक सामना दोन दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात पाहायला मिळाला होता. जर गुण समान असतील तर नेट रनरेटच्या आधारावर निकाल दिला जातो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"