विराट कोहलीचे शानदार शतक आणि कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलमध्ये काल सनरायजर्स हैदराबाद संघावर आठ गडी व चार चेंडू राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह बंगळुरूने प्ले ऑफचे आव्हान कायम राखले आहे.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिले तर आयपीएलमधील सहावे शतक झळकावले. या शतकासह विराट कोहलीने युनिवर्स बॉस ख्रिस गेलची बरोबरी केली. विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या नावावर प्रत्येकी सहा सहा शतकांची नोंद आहे. विराट कोहली याने ६३ चेंडूत शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या शतकीखेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान विराट कोहलीच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने हैदराबादमधील ग्राउंड स्टाफसोबत फोटो काढला. हा फोटो आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे शेअर केला आहे.
विराटने आयपीएल २०२३ मध्ये ५०० धावांचा टप्पाही ओलांडला आणि आयपीएलच्या सहा पर्वात त्याने हा पराक्रम केला. भारतीय फलंदाजांमध्ये असा पराक्रम करणारा विराट एकमेव ठरला. दोघांची फटकेबाजी लाजवाब ठरली आणि त्यांचे टायमिंग कौतुकास्पद होते. भुवीने टाकलेल्या १५व्या षटकात विराटने अप्रतिम पुस्तकी फटके मारून ३ चौकार मिळवले अन् संघाला १५० धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी यंदाच्या पर्वात ८००+ धावांची भागीदारी केली आणि आयपीएल इतिहासात पहिल्या विकेटसाठी एका पर्वातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांनी २०१९च्या पर्वात १० सामन्यांत ७९१ धावा जोडल्या होत्या.