PAK vs BAN Test Series : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी करताना २-० ने मालिका खिशात घातली. दुसरा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला मोठा संघर्ष करावा लागला असली तरी त्यांच्या या कामगिरीने इतिहास रचला. या विजयामुळे बांगलादेशच्या संघाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला असेल यात शंका नाही. विजयानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतोने बोलकी प्रतिक्रिया देताना टीम इंडियाला इशारा दिला. १९ तारखेपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पाकिस्तानचा पराभव होताच शेजारील देशातील माजी खेळाडू शान मसूदच्या संघावर तोंडसुख घेत आहेत. अशातच माजी कर्णधार वसीम अक्रमने संघासह पीसीबीला धारेवर धरले.
पाकिस्तानला मागील जवळपास तीन वर्षांपासून आपल्या घरात एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदला कर्णधारपद सोपवल्यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया दौरा केला आणि तिथेही त्यांना जबर मार खावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे WTC च्या शर्यतीत कायम राहणे शेजाऱ्यांना कठीण झाले आहे. वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी सर्वच फॉरमॅटमध्ये पाकिस्तानची 'कसोटी' पाहायला मिळत आहे. खरे तर पाकिस्तानला तब्बल १,३०३ दिवसांपासून आपल्या घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. विशेष म्हणजे बांगलादेश नंतर इतर सर्वात जुन्या दहा कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांपैकी प्रत्येकाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावणारा पाकिस्तान हा दुसरा संघ ठरला आहे.
वसीम अक्रमचा संतापवसीम अक्रमने सांगितले की, बांगलादेशकडून पराभूत होणे ही मोठी जखम आहे. एक माजी खेळाडू, माजी कर्णधार आणि क्रिकेट चाहता म्हणून मला याची लाज वाटते. पाकिस्तान चांगल्या स्थितीत असताना देखील शेवट चांगला करू शकला नाही. मला या काही गोष्टी अजिबात समजत नाहीत. आम्ही आपच्या घरात सातत्याने पराभूत होत आहोत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला खूप काही करावे लागेल. अक्रम एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्याने पाकिस्तानी संघावर बोचरी टीका केली.
दरम्यान, सलामीच्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला. पाहुण्या बांगलादेशने पाकिस्तानला दणका देत दुसरा सामना देखील जिंकला. यासह शेजाऱ्यांना आपल्या घरात सलग दहाव्या सामन्यात विजयापासून दूर राहावे लागले.