वन डे विश्वचषकात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. भारतात होत असलेल्या या स्पर्धेदरम्यान काही पाकिस्तानी खेळाडूंना चाहत्यांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला. पाकिस्तानी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानसमोर काही प्रेक्षकांनी किंबहुना अतिउत्साही 'रील'बाज तरूणांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या. यावरून वाद चिघळला असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) याची आयसीसीकडे तक्रार केली आहे. तसेच पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा मिळण्यास होत असलेल्या विलंबावरूनही PCB ने तक्रार केली. दरम्यान, यावरून अनेक जाणकारांसह माजी खेळाडू आपापली मतं मांडत आहेत.
पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुनावले. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "पाकिस्तानी पत्रकार झैनाब अब्बासला भारत आणि हिंदूंविरोधात टिप्पणी करायला कुणी सांगितले होते? मिकी आर्थर यांना आयसीसीचा इव्हेंट बीसीसीआयचा असल्याचे असे बोलायला कोणी भाग पाडले? मोहम्मद रिझवानला मैदानात नमाज अदा करण्यास कोणी सांगितले? त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधणे बंद करायला हवे."
PCBला सुनावले
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या दुटप्पी भूमिकेचा दाखला देत कनेरियाने सडकून टीका केली. मी पाकिस्तानसाठी माझे रक्त दिले आहे. त्यामुळे मला पाकिस्तान आणि येथील नागरिकांसोबत कोणतीही अडचणी नाही. माझी तक्रार केवळ माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा घमंडीपणा आणि त्यांच्या दुटप्पीपणाच्या चेहऱ्यावर माझा आक्षेप आहे, अशा शब्दांत त्याने आपल्या बोर्डाला घरचा आहेर दिला.
भारताला पाकिस्तानविरूद्ध 'आठ'वावा प्रतापपाकिस्तानचा मोठा पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
Web Title: After the Pakistan Cricket Board filed a complaint with the ICC against India, former Pakistan player Danish Kaneria has criticized the incident
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.