Sri Lanka Cricket board : वन डे विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आले आहे. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली. यासोबतच क्रीडा मंत्रालयाने श्रीलंकेतील क्रिकेट सुरळीत पार पाडण्यासाठी अंतरिम क्रिकेट समिती देखील स्थापन केली आहे. या समितीची जबाबदारी श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याच्याकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय संघाकडून ३०२ धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरोधात निदर्शने सुरू झाली होती. श्रीलंकेचे चाहते बोर्डाच्या कॅम्पसबाहेर शम्मी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील बोर्डातील सदस्यांना हटवण्याची मागणी करत होते.
दरम्यान, विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डावरील भ्रष्टाचारापासून मॅच फिक्सिंगपर्यंतचे अनेक जुने आरोपही चर्चेत आले होते. हे पाहता श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. क्रीडा मंत्री रणसिंघे यांनी पत्राच्या माध्यमातून सांगितले की, श्रीलंका क्रिकेट बोर्ड सध्या खेळाडूंच्या शिस्तभंगाच्या समस्या, व्यवस्थापनातील भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी वेढले आहे. मी यावर एवढेच सांगतो की, केवळ सुशासनाची तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी अंतरिम उपाययोजना केल्या जात आहेत.
श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्तखरं तर याआधीही रणसिंगे यांनी बोर्डातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. मात्र, आयसीसीने याला राजकीय हस्तक्षेप असल्याचे म्हटले होते. अशा स्थितीत क्रीडामंत्र्यांनी दबावाखाली हा निर्णय मागे घेतला. लक्षणीय बाब म्हणजे आता श्रीलंका किकेट बोर्ड बरखास्त केल्यानंतर आयसीसीने अद्याप याबद्दल काहीही भाष्य केले नाही. श्रीलंकेची निराशाजनक कामगिरी २०२३च्या विश्वचषकात श्रीलंकेची अवस्था अत्यंत वाईट आहे. आठपैकी सहा सामने गमावल्याने श्रीलंकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला. गुणतालिकेत तो नवव्या स्थानावर आहे. श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेने १०२ धावांनी, पाकिस्तानने ६ गडी राखून, ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून, अफगाणिस्तानने ७ गडी राखून, भारताने ३०२ धावांनी आणि बांगलादेशने ७ गडी राखून पराभूत केले.