Join us  

ही दोस्ती तुटायची नाय! विराटनं मॅच हरली पण भारतीयांची मनं जिंकली; माहीसाठी केली खास पोस्ट

RCB vs CSK 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामातील चोविसावा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 1:02 PM

Open in App

ms dhoni and virat kohli IPL । नवी दिल्ली : आयपीएलच्या १६व्या हंगामातील चोविसावा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) यांच्यात पार पडला. चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाहुण्या चेन्नईच्या संघाने ८ धावांनी बाजी मारली. विराट कोहली आणि धोनी यांच्यामुळे हा सामना खास राहिला. सामन्यानंतर या दोन्ही दिग्गजांनी गळाभेटी घेऊन खेळभावना दाखवली. कालच्या सामन्यात धोनीच्या चेन्नईने निर्धारित २० षटकांत ६ बाद २२६ धावा करून आरसीबीसमोर तगडे आव्हान ठेवले होते.

चेन्नईकडून डेव्होन कॉन्वेने ४५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने २७ चेंडूत ५२ धावा करून आरसीबीसमोर धावांचा डोंगर उभारला. खरं तर कालच्या सामन्यात कर्णधार धोनीला केवळ १ चेंडू खेळायला मिळाला अन् तो १ धाव काढून नाबाद तंबूत परतला. चेन्नईने दिलेल्या २२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला सुरूवातीलाच विराट कोहलीच्या (६) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस (६२) आणि ग्लेन मॅक्सवेल (७६) यांनी डाव सावरला आणि विजयाच्या दिशेने कूच केली.

कालच्या सामन्यानंतर विराटने धोनीसाठी एक पोस्ट केली असून भारतीय चाहत्यांची मनं जिंकली आहेत. विराटने पोस्टमध्ये इमोजी शेअर करत लिहले, "रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू+चेन्नई सुपर किंग्ज = भारत." 

विराटची धोनीसाठी खास पोस्ट 

दरम्यान, कालच्या सामन्यातील अखेरच्या काही षटकांमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांनी कमाल करत आरसीबीला एका पाठोपाठ एक मोठे धक्के दिले. डू प्लेसिस आणि मॅक्सवेलच्या जोडीला तंबूत पाठवून चेन्नईने सामन्यात पकड बनवली. अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने निर्धारित २० षटकांत केवळ २१८ धावा केल्या आणि संघाला पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईने ८ धावांनी विजय मिळवून २ गुणांनी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App