women premier league 2023 । मुंबई : महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. काल महिला प्रीमियर लीगसाठी मुंबईत लिलाव पार पडला. पाच फ्रँचायझींनी 87 खेळाडूंवर 59.50 कोटी रुपये खर्च करून पहिला WPL लिलाव संपवला. BCCI ने लिलावासाठी 409 खेळाडूंची निवड केली होती, ज्यात 270 भारतीयांचा समावेश होता. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आरसीबीच्या फ्रँचायझीने टेनिसपटू सानिया मिर्झावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे संघ रिंगणात असणार आहेत. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली, तिला आरसीबीच्या फ्रँचायझीने 3.40 कोटीमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे. सानियाच्या क्रिकेटमधील प्रवेशामुळे काही चाहते खूप खूश आहेत तर काही जण तिला ट्रोल देखील करत आहेत.
महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक -
- 4 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात
- एकूण 22 सामने
- 4 दुहेरी लढती
- डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने
- ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने
- 26 मार्चला अंतिम सामना
टेनिस विश्वात भारताचा डंका वाजवणाऱ्या सानियाने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आणि आता नवी जबाबदारी स्वीकारली आहे. सानियाने तिच्या सुवर्ण कारकिर्दीत 6 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आणि ती अलीकडेच शेवटची ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळताना दिसली होती. टेनिसमध्ये भारताचा नावलौकिक वाढवणारी सानिया मिर्झा आरसीबीच्या महिला संघाची मार्गदर्शक बनली आहे. पण टेनिस खेळाडू क्रिकेटचे काय मार्गदर्शन करणार असा प्रश्न उपस्थित करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. सानिया मिर्झा आरसीबीचा हिस्सा होत असल्याची बातमी आरसीबीनेच ट्विटच्या माध्यमातून दिली.
स्मृती मानधनावर पैशांचा वर्षाव
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावात सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 3.40 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. याशिवाय मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नॅट शीव्हर ब्रंटला 3.20 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले.
आगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: After the Royal Challengers Bangalore franchise roped in tennis star Sania Mirza as the team's mentor for the first season of the Women's Premier League, quirky memes are going viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.