Join us  

"चंद्राला गवसणी घातली आता...", मुंबई इंडियन्सनं रोहितचा फोटो शेअर करत भारतीयांची मांडली 'इच्छा'

बुधवारी इस्रोच्या टीमनं तमाम भारतीयांना खुशखबर देत ऐतिहासिक कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 12:54 PM

Open in App

chandrayaan 3 update : बुधवारी इस्रोच्या टीमनं तमाम भारतीयांना खुशखबर देत ऐतिहासिक कामगिरी केली. बुधवारचा दिवस भारतीयांचं स्वप्न साकार करणारा ठरला. भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर सत्यात उतरला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ नं मोठं यश मिळवलं. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर बुधवारी नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या ऐतिहासिक क्षणाचा दाखला देत इस्रोच्या टीमसह तमाम भारतीयांचं कौतुक केले.

दरम्यान, आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनं चांद्रयान-३ च्या यशाचा दाखला देत क्रिकेटप्रेमींसाठी मोठे संकेत दिले. मुंबईच्या फ्रँचायझीने शेअर केलेला हा पोस्टर सर्वत्र व्हायरल होत आहे. खरं तर २०१९ ला भारताची चांद्रयान-२ मोहीम यशस्वी झाली नव्हती. क्रॅश लॅंडिंग झाल्यामुळे भारतीयांचं स्वप्न धुळीस मिळालं होतं. पण २०२३ मध्ये पुन्हा एकदा नव्या उमेदीनं इस्रोच्या टीमनं अधुरं स्वप्न पूर्ण केलं. याचाच दाखला देत मुंबई इंडियन्सनं आगामी वन डे विश्वचषकाबद्दल मोठे संकेत दिले आहेत. २०१९ ला चांद्रयान-२ अपयशी ठरलं अन् भारतानं विश्वचषक गमावला. मात्र, २०२३ मध्ये भारताचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे आगामी विश्वचषक देखील भारतीय संघानं जिंकावा अशी चाहत्यांना आशा आहे. हाच धागा पकडून मुंबईच्या फ्रँचायझीनं पोस्टरच्या माध्यमातून तमाम भारतीयांची इच्छा मांडली आहे. 

विशेष बाब म्हणजे २०२३ ला चांद्रयान-३ यशस्वी झालं आता आपण आगामी विश्वचषक देखील जिंकू असं मुंबईच्या ट्विटमधून भासवण्यात आलं आहे. चांद्रयान-३नं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर एक संदेश पाठवला आहे. "मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो आहे आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत या ठिकाणी पोहोचला आहे", अशा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला आहे. इस्रोने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह इस्रोच्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याकडे पृथ्वीला आई तर चंद्राला मामा म्हटलं जातं. तर ‘चंदामामा दूर के’ हा वाकप्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र आता तो बदलून चंदामामा टूक के असं म्हणावं लागेल, अशा शब्दांत मोदींनी या यशाचा आनंद व्यक्त केला.  

टॅग्स :चंद्रयान-3इस्रोरोहित शर्मावन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघ
Open in App