Indian Cricketer death । नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटपटू राजश्री स्वेन मागील 3 दिवसांपासून बेपत्ता होती. पोलिसांनी तिचा तपास केला असता तिच्या मोबाईल नेटवर्कचे शेवटचे लोकेशन कुठे आहे याच्या मदतीने राजश्रीच्या मृतदेहापर्यंत पोहचण्यात यश मिळाले. भारतीय महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. ओडिशाची महिला क्रिकेटर राजश्री हिचा मृतदेह गुरुडिझहटिया जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. राजश्रीच्या कुटुंबीयांनी ओडिशा क्रिकेट असोसिएशन आणि महिला संघाच्या प्रशिक्षकावर आरोप केले आहेत.
22 वर्षीय राजश्री अचानक बेपत्ता झाली आणि शुक्रवारी तिचा मृतदेह सापडला. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना यापूर्वी पुरी येथील राजश्रीची स्कूटर आणि हेल्मेट सापडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात राजश्रीचा मोबाईल बंद होता. शेवटच्या मोबाईल नेटवर्क लोकेशनवरून पोलीस तेथे पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
"संघात पैसे देऊन होत होती निवड"दरम्यान, राजश्री स्वेन 11 जानेवारीपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह सापडल्यानंतर राजश्रीच्या चुलत भावाचे एक विधान समोर आले आहे. त्याने सांगितले की, "राजश्रीने फोनवर सांगितले होते की, काही खेळाडूंना पैसे देऊन संघात समाविष्ट केले होते आणि तिला वगळण्यात आले होते. या कॉलनंतर आम्ही पुन्हा तिला फोन करण्याचा प्रयत्न केला असता राजश्रीचा मोबाईल बंद होता. ती मजबूत होती आणि ती आत्महत्या करू शकत नव्हती, ती एक अष्टपैलू खेळाडू देखील होती. तिने मला शेवटच्या वेळी 11 जानेवारी 2021 रोजी फोनवर सांगितले होते की, ती ओडिशा क्रिकेट असोसिएशन टीम आणि प्रशिक्षकांशी वारंवार नकार दिल्याबद्दल चर्चा करणार आहे." अशी माहिती आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिली.
कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप राजश्रीबद्दल असोसिएशनने ती बेपत्ता असल्याची नोंद केली होती. ओडिशा टीव्हीच्या वृत्तानुसार, राजश्री क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात भाग घेतलेल्या 25 सदस्यीय संघाचा भाग होती, परंतु अंतिम संघात स्थान मिळवू न शकल्यामुळे ती तणावाखाली होती आणि जानेवारीपासून ती दिसली नाही. एका वाहिनीशी बोलताना राजश्रीच्या आईने सांगितले की, त्यांची मुलगी सिलेक्शन कॅम्पसाठी कटक येथे आली होती आणि एका हॉटेलमध्ये थांबली होती. 10 दिवसांच्या शिबिरानंतर, त्यांची मुलगी सर्वोत्तम खेळाडू असतानाही तिला जाणूनबुजून अंतिम संघातून वगळण्यात आले. तेव्हापासून त्यांची मुलगी तणावात होती आणि तिने बहिणीलाही फोन केला होता. राजश्रीच्या आईने असोसिएशनवर आरोप केला आहे की, त्यांनी तिची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती यापूर्वी दिली नाही. शिबिर आयोजकांनीही त्यांना सांगितले नाही. त्यांनी स्वतः संपर्क साधला तेव्हा आयोजकांनी सांगितले की त्यांची मुलगी बेपत्ता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"