ind vs aus final match | अहमदाबाद : वन डे विश्वचषकातील सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संधीच्या शोधात असलेल्या मोहम्मद शमीने संघात स्थान मिळताच आपली ताकद दाखवून दिली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 'पंजा' मारून जोरदार पुनरागमन केले. साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकण्यात भारताला यश आले. पण, ज्या संघाला पराभूत करून भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली होती त्याच ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत पराभवाचा वचपा काढला... एकूणच भारताच्या तोंडचा घास पळवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. तब्बल १० वर्षांनंतर का होईना भारत आयसीसीचा किताब जिंकेल असे वाटत असताना रोहितसेनेला ट्रॉफीपासून एक पाऊल लांब राहावे लागले.
अंतिम फेरीत पराभव करून ऑस्ट्रेलियानं तमाम भारतीयांची हृदयं तोडली. भारताच्या पराभवानंतर विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी भारतीय संघाला धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना पाहण्यासाठी सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधांनासोबत सामन्याचा आनंद लुटला.
सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच मोदींनी भारतीय शिलेदारांच्या मेहनतीचे कौतुक केले. यंदाच्या पर्वात सर्वाधिक (२४) बळी घेणारा मोहम्मद शमी भारतासाठी हुकुमी एक्का ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोदींंनी ड्रेसिंग रूममध्ये मोहम्मद शमीची भेट घेऊन त्याच्या खेळीला दाद दिली. मोदींच्या भेटीनंतर शमीने एक भावनिक पोस्ट करत म्हटले, "दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. पण संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो... खासकरून ड्रेसिंग रूममध्ये येऊन आमचा उत्साह वाढवल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. आम्ही चांगले पुनरागमन करू."
अंतिम सामन्यात नाणेफेकिचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.