नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या काही गोष्टींमध्ये सातत्याने प्रयोग होत असल्याचे आपण पाहिले आहे. सध्याच्या घडीला ट्वेन्टी-20 क्रिकेट हे सर्वात प्रसिद्ध असल्याचे म्हटले जाते. पण आता त्यापेक्षाही कमी चेंडूंचे क्रिकेट खेळवण्याचा विचार इंग्लंड करत आहेत. इंग्लंडमध्ये सध्याच्या घडीला 100 चेंडूंच्या सामन्यांचे आयोजन केले जात आहे आणि 2020 पर्यंत या प्रकारच्या क्रिकेटची स्पर्धाही खेळवली जाणार आहे. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनीही या क्रिकेटच्या प्रकाराचे स्वागत केले आहे.
इंग्लंड क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्स यांनी याबाबत सांगितले की, " तरुणांना नवनवीन गोष्टी हव्या असतात. सध्याच्या घडीला आम्ही 100 चेंडूंचा सामना खेळवण्याचा प्रयोग करत आहोत आणि देशातील तरुणांनाही ते चांगलेच पसंतीस पडत आहे. सध्याच्या घडीला या क्रिकेटच्या प्रकाराला चांगली प्रसिद्धीही मिळत असल्याने आम्ही येत्या दोन वर्षांमध्ये या क्रिकेटच्या प्रकाराची स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहोत. "
100 चेंडूंचा सामना कसा खेळवणारइंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने 100 चेंडूंच्या सामन्यांची स्पर्धा खेळवण्याचे जाहीर केले आहे. पण हे सामने कसे असतील, ते जाणून घेऊया. या सामन्यात सहा चेंडूंची 15 षटके टाकली जातील, म्हणजे 90 चेंडू नेहमीप्रमाणे खेळवले जातील. पण अखेरचे षटक हे दहा चेंडूंचे असेल. त्यामुळे यावेळी गोलंदाजांचा चांगलाच कस लागणार असल्याचे म्हटले जात आहे.