नवी दिल्लीः वर्ल्ड कप स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटपासून दोन महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी या दोन महिन्यांमध्ये भारतीय सैन्याबरोबर सराव करणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन मालिका खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात परत येणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर अनुक्रमे बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्याबरोबर भारताचे सामने होणार आहेत. त्यामुळे हे सामने खेळण्यासाठी धोनी दोन महिने क्रिकेटपासून लांब राहीला असल्याचे म्हटले जात आहे.
पण, समोर आलेल्या वृत्तानुसार धोनीनं वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानच निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र, कर्णधार विराट कोहीलच्या सांगण्यावरून त्यानं तो निर्णय बदलला. वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीनं निवृत्ती घेऊ नये, असे कोहलीला वाटत होते. DNAया इंग्रजी वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की,''कर्णधार कोहलीचा सल्ला धोनीनं एकला आणि निवृत्ती घेण्याचा विचार पुढे ढकलला. धोनीच्या बाबतीत तंदुरुस्तीचा कोणताच मुद्दा नाही, असे कोहलीला वाटते. त्यामुळे तो पुढील वर्षी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही खेळू शकतो. वर्ल्ड कप दरम्यान निवृत्ती घेण्याबाबत धोनीनं सहकाऱ्यांशी चर्चाही केली होती. या संदर्भात धोनीनं चेन्नई सुपर किंग्जलाही कळवलं होतं.''
रिषभ पंत याच्याकडे संघातील भविष्याचा यष्टिरक्षक म्हणून पाहिले जात आहे. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी धोनीनं संघासोबत रहावे, अशी कोहलीची विनंती होती. त्यामुळे धोनीनं त्याचा निवृत्तीचा निर्णय बदलला.
धोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर भारताचा यष्टीरक्ष महेंद्रसिंग धोनीने पुढील दोन महिने लष्करी सेवेत घालवणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, लष्करासोबत प्रशिक्षण घेण्यासाठी धोनीने परवानगी मागितली होती. अखेर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला लष्करासोबत राहून प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे.
बिपीन रावत यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर आता धोनी पॅराशूट रेजिमेंट बटालियनसह प्रशिक्षण घेणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान धोनी काही काळ जम्मू काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेणार आहे. तसेच धोनी लष्करासोबत प्रशिक्षण घेणार असला तरी तो कुठल्याही अॅक्टिव्ह ऑपरेशनमध्ये सहभागी होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे.