Deepak Chahar at Rishikesh: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने नागपूरला भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला जाण्यापूर्वी संपूर्ण कुटुंबासह ऋषिकेशमध्ये वेळ घालवला होता. गंगा आरतीसह त्याने तेथील साधूंचीही सेवा केली होती. तसेच, स्वामींच्या आश्रमातही गेला होता. त्यानंतर आता भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर हा देखील ऋषिकेशला पोहोचला आहे. सध्या तो टीम इंडियातून बाहेर आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे तो खूप त्रस्त होता. सुमारे पाच महिन्यांनी तो परतला, पण पुन्हा जखमी झाला. दीपकचे लक्ष आता पूर्णपणे त्याच्या फिटनेसवर आहे. चहर आता गंगामातेच्या भेटीला गेला असून तेथून सकारात्मकता घेण्याचा प्रयत्न करत आहे.
ऋषिकेशमध्ये दीपक चहर एकटा गेलेला नसून त्याच्यासोबत त्याची पत्नी जया भारद्वाजही आहे. गंगा पूजेशिवाय हे दोघे तेथे फिटनेसचेही प्रशिक्षण घेणार असल्याचे सांगितले जात आहे. जया तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते आणि याच कारणास्तव ती देखील चहरसोबत ऋषिकेशमध्ये योगाच्या माध्यमातूनही फिटनेसकडे लक्ष देत आहे. चहरने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
चहर गंगेच्या तीरावर पोहोचला
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून, चहरने त्याच्या दिनचर्येबद्दल आणि ऋषिकेशमधील काही गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये हा गोलंदाज गंगेत डुबकी मारताना दिसत आहे. यासोबतच त्यांनी गंगा आरतीमध्येही सहभाग घेतला. चहर गंगेच्या काठावर प्रशिक्षण घेताना दिसला. कधी धावताना तर कधी पत्नीसोबत योगा करताना दिसला. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत हर हर शंभू हे गाणे वाजत होते. हा व्हिडिओ शेअर करताना चहरने क्रिकेटच्या मैदानात परतण्याचेही संकेत दिले आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'कधी-कधी तुम्हाला थांबावे लागते, जेणेकरून तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकाल आणि तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकाल.'
दुखापतीमुळे चहरसाठी पुनरागमन झाले होते कठीण
दीपक चहरने शेवटचा सामना ७ डिसेंबर २०२२ रोजी खेळला. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला त्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो आयपीएलमधून बाहेर पडला होता. तब्बल पाच महिन्यांनी तो ऑगस्टमध्ये परतला. टी-२० विश्वचषकासाठी तो कदाचित संघात स्थान मिळवेल, असे वाटत होते. त्याला राखीव म्हणून ठेवण्यातही आले होते, पण काही वेळाने तो पुन्हा एकदा जखमी झाला. डिसेंबर महिन्यात तो संघात परतला पण बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला पुन्हा दुखापत झाली.